अमोल कोल्हेंनी `ट्रेलर` दाखवताच विलास लांडे झाले अॅक्टिव्ह

विलास लांडेंची शहरात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी पुन्हा धडपड
अमोल कोल्हेंनी `ट्रेलर` दाखवताच विलास लांडे झाले अॅक्टिव्ह
amol kolhe-vilas lande.jpg

पिंपरी : शिरूरचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर त्या पक्षात राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. आपली ही बैठक आगामी महापालिका निवडणुकीचा ट्रेलर असल्याचे वाक्य कोल्हे यांनी केले होते. त्याचा परिणाम म्हणून पक्षातील जुने नेते पुन्हा कृतीशील झाले आहेत. यात प्रामुख्याने माजी आमदार विलास लांडे यांचे नाव घेण्यात येत आहे. कोल्हे यांच्यामुळे लोकसभा निवडणुकीचे 2019 मधील तिकिट न मिळालेले लांडे या वेळी कोणताही धोका पत्करायला तयार नाहीत. 

कोल्हे यांनी बैठकीत सूचक विधान करत पिंपरी-चिंचवडच्या आगामी निवडणुकीत मोठी भूमिका बजावणार असल्याचे संकेत दिले. त्यामुळे साहजिकच स्थानिक नेत्यांना तो सूचक इशारा होता. खरे तर पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीत अजित पवार यांच्याशिवाय कोणाचाच शब्द चालत नाही. अजितदादा हे कोल्हेंना बळ तर देत नाही ना, अशी शंका स्थानिक नेत्यांना आल्याने ते पण आपल्या परीने सक्रिय झाले आहेत.  

पुण्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक दीड वर्षांवर आहे. या निवडणुकीत अनेक घडामोडींची शक्यता आहे. राज्यातील सत्ता समीकरणांचा परिणाम पिंपरी-चिंचवडमध्येही होणार आहे. त्यामुळेच स्थानिक नेतेही परिस्थितीचा अंदाज घेत आहेत. मध्यंतरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे विलास लांडे यांच्या घरी आले होते. तेव्हा पवार यांनी लांडेंना पुन्हा सक्रिय होण्याचा सल्ला दिल्याची चर्चा होती. मात्र कोरोनाच्या स्थितीमुळे राजकीय हालचालींना मर्यादा होत्या. तेवढ्यात कोल्हे यांचा मेळावा झाल्याने लांडे पण `चार्ज` झाले आहेत. लांडे यांनाही आता आपण भोसरी मतदारसंघाची मर्यादा सोडावी, असे वाटू लागले आहे. त्यांच्यमागून राजकारणात आलेले लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे हे दोघे शहराचे कारभारी म्हणून भाजपने पुढे आणले.

या दोघांत भले विस्तव जात नसेल पण शहराची राजकीय सूत्रे या दोघांकडेच असल्याचे सध्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर लांडे हे सध्या अडगळीत पडले आहेत. त्यातही  किती दिवस भोसरीचा नेता म्हणून वावरायचे, असे विचारणा त्यांचेच कार्यकर्ते करू लागल्याने त्यांनीही आता बैठकांचा आणि संपर्काचा धडाका  लावला आहे. तयामुळे लांडे हे कार्यकर्त्यांशी संपर्क साधू लागले आहेत. राष्ट्रवादी शहराध्यक्ष बदलण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे तेथेही काही भूमिका बजावता येते का, याकडे लांडे यांचे लक्ष आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in