लाचखोरीवरून राष्ट्रवादीचा यु-टर्न अन् भाजपची साथ देत 44 कोटींची कामंही मंजूर

स्थायीतील लाचखोरी व टक्केवारीवर शिक्कामोर्तब झाल्याने स्थायीच्या पुढील बैठकांना पक्षाचे चार सदस्य हजर राहणार नाहीत, अशी घोषणा राष्ट्रवादीने केली होती.
U turn of PCMC NCP corporators over corruption issue
U turn of PCMC NCP corporators over corruption issue

पिंपरी : गेल्या महिन्यात 18 तारखेला पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे हे लाच घेताना पकडले गेले. त्यानंतर स्थायीतील लाचखोरी व टक्केवारीवर शिक्कामोर्तब झाल्याने स्थायीच्या पुढील  बैठकांना पक्षाचे चार सदस्य हजर राहणार नाहीत, अशी घोषणा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी केली होती. मात्र, आठवड्यातच ही घोषणा हवेत विरली. त्यांच्याच संमतीने त्यांचे सर्व सदस्य कालच्या (ता. 8) स्थायी सभेत हजरच राहिले नाहीत तर, त्यांनी 44 कोटी रुपयांचे विषय कसलाही विरोध वा चर्चा न करता मंजूरही केले. (U turn of PCMC NCP corporators over corruption issue)

राष्ट्रवादीच्या या यु-टर्नची पालिकेत जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे पितळ त्यांच्या सदस्यांच्या सहभागामुळे उघडे पडले. टक्केवारीसाठी ते पुन्हा सहभागी झाल्याची कुजबूज ऐकू आली. गेल्या महिन्यात 18 तारखेला स्थायी अध्यक्ष व स्थायीचे चार कर्मचारी ठेकेदाराकडून निविदा रकमेच्या दोन टक्के लाच घेताना पकडले गेले. त्यानंतर आठ दिवसांनी जाग्या झालेल्या विरोधी पक्ष राष्ट्रवादीने आंदोलन केले. भाजपवर त्यांनी तोंडदेखली आगपाखड केली. या भ्रष्ट व टक्केवारीवर शिक्कामोर्तब झालेल्या स्थायीच्या बैठकांना आपले सदस्य उपस्थित राहणार नाहीत, अशी राणा भीमदेवी थाटात त्यांच्या शहराध्यक्षांनी घोषणाही करून टाकली. 

गत साप्ताहिक सभेला (ता. 1) हे सदस्य उपस्थित राहिले नाहीत. मात्र, बुधवारी झालेल्या सभेला ते हजर राहिले. एवढेच नाही तर वादाच्या विषयांवर त्यांनी तोंडही उघडले नाही. त्यावर चर्चाही केली नाही. सर्वानूमते 44 कोटींचे सर्व विषय मंजूर झाले. त्यामुळे शहराच्या विकासात अडथळा येऊ नये आणि कारभार सुरळीत रहावा यासाठी आपले सदस्य सहभागी झाले, हा विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे राजू मिसाळ यांचा दावा फोल ठरला. चुकीच्या प्रस्तावांना ते विरोध करतील, ही शहरवासियांची आशा निष्फळ ठरली. त्यावर घटनेने दिलेल्या अधिकाराचे पालन केले, असा न पटणारा युक्तिवाद करून बाजू सावरण्याचा प्रयत्न मिसाळ यांनी 'सरकारनामा'शी बोलताना आज केला. 

बहुमताच्या जोरावर सत्ताधारी विषय रेटून नेतील. म्हणून त्यांच्या चुकीच्या कामांना विरोध करण्यासाठी आमचे सदस्य पुन्हा स्थायीच्या बैठकीला हजर झाले, असे स्पष्टीकरण शहराध्यक्ष वाघेरे यांनीही आज दिले. पण, तुमच्या सदस्यांनी कालच्या व त्याअगोदरच्या स्थायीच्या बैठकांतही कधी चुकीच्या विषयांना विरोध केला नाही. वादाच्या विषयांवर तोंड न उघडता मंजूरी दिली, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्यांना समर्पक उत्तर देता आले नाही. एकूणच भाजपच्या लाचखोरीचे आयते कोलित हाती येऊनही त्याचा करेक्ट कार्यक्रम करण्यात पिंपरीत राष्ट्रवादीला अपयश आले. 

दरम्यान, स्थायीच्या बैठकांना हजर राहणार नाही, अशी घोषणा करून राष्ट्रवादीचे सदस्य पुन्हा उपस्थित का राहिले, अशी विचारणा पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार विलास लांडे यांनी केली. त्यांचा रोख हा आर्थिक कारणासाठी हे सदस्य हजर राहिले, य़ाकडे होता. ही उपस्थिती चुकीचे असल्याचे सांगत आगामी सभांना तरी आता त्यांनी हजेरी लावू नये, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com