साप्ते आत्महत्येप्रकरणी दोन जणांना अटक     - Two arrested in Sapte suicide case  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

साप्ते आत्महत्येप्रकरणी दोन जणांना अटक    

उत्तम कुटे
सोमवार, 5 जुलै 2021

त्यामुळे फिल्मसिटीत प्रचंड खळबळ उडाली होती.

पिंपरी :  कला दिग्दर्शक राजेश मारुती साप्ते (वय ५१, रा. ताथवडे, पिंपरी-चिंचवड आणि कांदीवली पश्चिम, मुंबई ) यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांचा भागीदार चंदन रामकृष्ण ठाकरे (वय ३६, रा. कांदीवली पश्चिम,मुंबई) याला पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) (वाकड) पोलिसांनी अटक केली. त्याला १० जुलैपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील नरेश विश्वकर्मा (मिस्त्री) या दुसऱ्या आरोपीला मुंबईतून वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, मुख्य आरोपी राकेश मौर्या हा अद्याप फरार आहे. (Two arrested in Sapte suicide case) 

गोरेगाव (पूर्व), मुंबई  (Mumbai) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील (फिल्मसिटी) फिल्म स्टुडिओ अॅन्ड अलाईड मजदूर युनियनचा खजिनदार मौर्या व त्याच्या साथीदारांच्या छळाला व आर्थिक शोषणाला कंटाळून साप्ते यांनी ताथवडेतील आपल्या घरी शनिवारी (ता.३) पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे फिल्मसिटीत प्रचंड खळबळ उडाली होती. साप्ते यांचा छळ करणे, धमकावणे व त्यांच्याकडून पैसे उकळल्याची मुख्य घटना मुंबईत (गोरेगाव) घडली आहे. त्यामुळे उशीरा जाग आलेल्या मुंबई पोलिसांनीही आता याप्रकरणी तपास सुरु केला आहे. मात्र, आत्महत्या ही पिंपरी-चिंचवड शहरात (ताथवडे) झाल्याने त्याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच खंडणी उकळल्याचा गुन्हा वाकड पोलिसांनी नोंदवून तत्पर कारवाईही सुरु केली आहे.  

...तर रामदास आठवले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते

त्यात ठाकरेला अटक केली असून विश्वकर्माला मुंबईत ताब्यात घेण्यात आल्याची माहिती वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिली. साप्तेंच्या पत्नी सोनाली (वय ४५) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याचे तपासाधिकारी अनिल लोहार यांनी आरोपी ठाकरेला आज न्यायालयात हजर केले. ठाकरेने साप्तेंकडून दीड कोटी रुपये घेतले असून ते जप्त करायचेत तसेच इतर आरोपींचा शोध घ्यायचा असल्याचे सांगून आरोपीच्या पोलिस कोठडीची मागणी त्यांनी केली. ती मान्य करून न्यायालयाने १० तारखेपर्यंत ती दिली. गंगेश्वर श्रीवास्तव (संजूभाई), अशोक दुबे व मौर्या (सर्व रा. मुंबई) या बाकीच्या आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.

दरम्यान, मौर्या, श्रीवास्तव, विश्वकर्मा यांच्या छळामुळे आत्महत्या करीत असल्याचे साप्ते यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सात पानी पत्रात (सुसाईड नोट)लिहून ठेवले आहे. आरोपींना कडक शासन करण्याची मागणी त्यांनी या पत्रात तसेच जीव देण्यापूर्वी चित्रित केलेल्या व्हिडिओतही केली आहे. गेल्या सात वर्षापासून हे आरोपी साप्तेंना त्रास देत होते. त्यांच्या सेटवर जाऊन पैशाची मागणी करीत होते. ते दिले नाही, तर काम बंद पाडत होते. 

नांगरे पाटील, तुकाराम मुंढे, भरत आंधळे यांनीच आता पुढे यावे...

प्रत्येक प्रोजेक्टमागे त्यांनी एक लाख रुपयांची खंडणी मागितली होती. तसेच सेटवर व्यवस्थित काम करून देण्यासाठी व त्याकरिता लागणाऱ्या कामगारांचा पुरवठा सुरळीत ठेवण्याकरिता दहा लाख रुपये मागून त्यापैकी अडीच लाख रुपये घेतले होते. त्यानंतरही साप्तेंच्या आत्महत्येच्या दोन दिवस अगोदरपर्यंत म्हणजे १ जुलैपर्यंत आरोपींकडून छळवाद सुरुच होता. २९ जूनला मौर्याने त्यांचे काम बंद पाडले होते. युनियनच्या या चार जणांखेरीज साप्तेंचा भागीदार ठाकरे यानेही त्यांचा विश्वासघात करून त्यांची फसवणूक केली होती. परिणामी त्रास, असह्य होऊन साप्तेंनी शनिवारी (ता.३) पहाटे ताथवडे येथील आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख