आजचा वाढदिवस : लक्ष्मण जगताप (आमदार, भाजप,चिंचवड विधानसभा मतदारसंघ) - Today Birthday Laxman Jagtap MLA BJP Chinchwad Assembly constituency | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : लक्ष्मण जगताप (आमदार, भाजप,चिंचवड विधानसभा मतदारसंघ)

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

लक्ष्मण जगताप  हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून निवडून आले. 

पिंपरी : लक्ष्मण जगताप हे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन टर्म आमदार आहेत.२००९ ला ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. तर, २०१४ आणि २०१९ ला भाजपकडून ते विजयी झालेले आहेत. त्यापूर्वी २००४ ला ते विधान परिषदेवर निवडून आले होते.

पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदावरून ते नुकतेच पायउतार झाले आहेत. ते शहराचे सध्याचे कारभारी आहेत. भाऊ म्हणून त्यांची ख्याती आहे. गेली ३५ वर्षे ते राजकारणात आहेत. १९८६ ते २००६ अशी सलग वीस वर्षे पिंपरी-चिंचवड पालिकेत ते नगरसेवक होते. १९९३ ला ते स्थायी समिती अध्यक्ष, तर २००२ ला महापौर झाले. २०१४ ची लोकसभा निवडणूक ते शेतकरी कामगार पक्षाकडून लढले. मात्र, त्यात ते पराभूत झाले.शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. तोपर्यंत ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते. त्यानंतर २०१४ च्या विधानसभेला ते भाजपकडून निवडून आले. 

२०१७ ला पिंपरी पालिकेत प्रथमच भाजप सत्तेत येण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कारण त्यावेळी त्यांच्या मतदारसंघातील बहूतांश नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला व पुन्हा निवडून आले.कार्यकर्त्यांचे मोठे जाळे त्यांच्याकडे आहे. सांगवीतील गणेश को ऑपरेटीव्ह बँक,न्यू मिलेनियम इंग्लिश मिडीयम स्कूल,प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्सचे ते संस्थापक, तर पतंजली योगपीठ, हरिव्दारचे ते संस्थापक सदस्य आहेत. सद्गगुरु वामनराव पै जीवन विद्या मिशनचे ते मुख्य सल्लागार आणि आर्ट ऑफ लिव्हींगचे आजीव सदस्य आहेत.

चार वेळा आमदार राहिल्याने गेल्या फडणवीस मंत्रीमंडळात त्यांना मंत्रीपद मिळेल, अशी शहरवासियांना आशा होती. कारण त्यानिमित्त शहराचाही मंत्रीपदाचा बॅकलॉग त्यानिमित्ताने भरून निघणार होता.मात्र, शेवटच्या क्षणी ही संधी मावळचे आमदार बाळा ऊर्फ संजय भेगडे यांना देण्यात आली. अन् शहराला पुन्हा एकदा मंत्रीपदाने हुलकावणी दिली. पुण्याप्रमाणे पिंपरी पालिकेतही काही गावांच्या समावेशाच्या हालचालींना वेग आलेला आहे. त्यातील आय़टी हब हिंजवडी व आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयम असलेले गहूंजेसह पालिका हद्दीजवळील माण, नेरे, सांगवडे, मारुंजी आदी गावे पिंपरी महानगरपालिकेत सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव तथा मागणी भाऊंची आहे. मितभाषी असलेले भाऊ हे हेडमास्तर म्हणून ओळखले जातात. फिटनेसचा त्यांचा स्वतःचा फंडा आहे. सायकलिंग, पोहणे आणि घोडेस्वारी यामुळे ते तंदुरुस्त आहेत.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख