कोरोनाचा उद्रेक झाल्याने पुन्हा रेड, ऑरेंज आणि यलो झोन होणार 

कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.
कोरोनाचा उद्रेक झाल्याने पुन्हा रेड, ऑरेंज आणि यलो झोन होणार 
Corona, Lockdown .jpg

पिंपरी : कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. कोरोना नियमांचा भंग करणाऱ्यांना आता दंड नाही, तर थेट फौजदारी कारवाईला पिंपरी-चिंचवडमध्ये सामोरे जावे लागणार आहे. तसेच शहरात पुन्हा रेड, ऑरेंज, यलो झोन तयार करण्यात येणार आहेत. तर, जास्त कोरोना रुग्ण आढळलेले भाग आणि कोरोना नियम तोडणारी दुकाने सील केली जाणार आहेत. 

दरम्यान, आज शहरात पुन्हा हजाराच्या वर रुग्ण (११८७) सापडले, तर तब्बल १६ जणांचा मृत्यू (त्यात पालिका हद्दीबाहेरील पाच) झाल्याने पालिका प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. त्यामुळे पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी तातडीने आढावा बैठक घेऊन कारवाई आणखी कडक करण्याचे आदेश दिले. त्यासाठी पालिका प्रशासन आता पोलिसांचीही मदत घेणार आहेत. 

त्यांची ड्युटी पालिकेत वॉररुममध्ये आता लावली जाणार आहे. पोलिस अधिकारी तेथील पालिका अधिकाऱ्यांच्या मदतीला असणार आहेत. तर, या वॉररुमची जबाबदारी पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांविरुद्धही फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. 

गर्दीच्या ठिकाणांची वरचेवर तपासणी करण्याचेही या बैठकीत ठरले. तसेच आता सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर कारवाईसाठी भरारी पथके स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.

पुणे, मुंबई आणि नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास लॉकडाऊन करावे लागेल, अशा शब्दात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनचा इशारा दिला. 

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे चित्र आहे. कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठल्याने चिंता वाढली आहे. मुंबई, पुणे, नागपुर या तीन शहरात सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. अखेर आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच जर नियम पाळले नाही तर लॉकडाऊन कारवे लागेल, असे म्हटले आहे.

Edited By - Amol Jaybhaye  

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in