स्मार्ट सिटीच्या सर्व्हरवर सायबर हल्ला : डेटा इनक्रिप्ट झाल्याचे उघड

यामुळे पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले असून त्याबाबत काल पोलिसांच्या सायबर शाखेत तक्रार देण्यात आली आहे.
स्मार्ट सिटीच्या सर्व्हरवर सायबर हल्ला : डेटा इनक्रिप्ट झाल्याचे उघड
Cyber ​​attack on Smart City's server .jpg

पिंपरी : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला करून डेटा इनक्रिप्ट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले असून त्याबाबत काल पोलिसांच्या सायबर शाखेत तक्रार देण्यात आली आहे. यामुळे अगोदरच कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या स्मार्ट सिटीचा भोंगळ कारभार पुन्हा उघड झाला आहे. यानिमित्ताने विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे.

ही घटना २६ फेब्रुवारी रोजी घडली मात्र, त्याबाबत काल मंगळवार ( ता.९ मार्च ) म्हणजे तब्बल १५ दिवस उशीराने पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. म्हणजे तक्रार देण्यातही निष्काळजीपणा झाल्याचे वरकरणी दिसून येत आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाची निगडी येथील अस्तित्व मॅालमध्ये सर्व्हर रुम आहे. हे काम टेक महिंद्रा कंपनीला पालिकेने दिले आहे. 

तेथील २७ सर्व्हरमधील डेटा इनक्रिप्ट केल्याचा प्रकार २६ फेब्रुवारीला घडला आहे. त्याबाबत या खासगी कंपनीचे प्रोग्राम मॅनेजर महेंद्र लाठी यांनी काल निगडी पोलिसांत ही तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून सायबर सेल पुढील तपास करीत आहे.

दरम्यान, हा सायबर हल्ला असल्याचे तो कोणी केला हे अद्याप समजले नसल्याचे पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पालिकेचे माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख नीळकंठ पोमण यांनी "सरकारनामाला" सांगितले. मात्र, या हल्यात पालिकेचा कसलाही डाटा चोरीला गेल्या नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. टेक महिंद्रा कंपनीचे इन्स्टॉलेशनचे नुकसान झाले असून ते त्यांना पुन्हा करावे लागेल, अशी माहिती त्यांनी दिली.  

Edited By - Amol Jaybhaye


 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in