ठाकरेंची जयंती प्रथमच सरकारी पातळीवर साजरी.. - ShivSena chief Balasaheb Thackeray birthday was celebrated at the government level for the first time today | Politics Marathi News - Sarkarnama

ठाकरेंची जयंती प्रथमच सरकारी पातळीवर साजरी..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 23 जानेवारी 2021

पिंपरी-चिंचवड महापालिकेतही बाळासाहेबांच्या प्रतिमेला भाजपच्या महापौर माई ढोरे  यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

पिंपरीः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस शासकीय पातळीवर आज पहिल्यांदाच साजरा झाला. त्यांचा  राज्य सरकारच्या थोर व्यक्तींच्या यादीत नुकताच समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त भाजप सत्ताधारी पिंपरी-चिंचवड महापालिकेतही बाळासाहेबांच्या प्रतिमेला भाजपच्या महापौर माई ढोरे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

देशाभिमान ओतप्रोत भरलेले बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये  उत्तम संघटन कौशल्य होते. तरुणपिढीमध्ये संघटनात्मक बांधिलकी रुजावी, यासाठी त्यांनी विशेष कार्य केले. त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहिल, असे महापौर यावेळी म्हणाल्या.  

याच महिन्यात १४ तारखेला राज्य सरकारने आपली राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्तींची यादी दुरुस्ती करीत बाळासाहेबांसह आणखी चार नावांची त्यात भर टाकली. या यादीतील राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्तींच्या जयंतीदिनी सरकारकडून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली जाते. त्यानुसार आजची बाळासाहेबांची जयंती शासकीय पातळीवर झाली. पिंपरी पालिकेने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंतीही मोठ्या उत्साहात साजरी केली.

यानिमित्त महापालिकेच्या येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी  नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस महापौरांच्या हस्ते पुष्षहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके,  अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, शिवसेना नगरसेवक अमित गावडे, अश्विनी चिंचवडे, रेखा दर्शले, मीनल यादव, शिक्षण मंडळाचे माजी सभापती गजानन चिंचवडे, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, माहिती व जनसंपर्क विभागाचे सोमनाथ साबळे आदी उपस्थित होते.यानिमित्त महापौरांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या.  

हेही वाचा : पवार, फडणवीस, ठाकरे यांची आज भेट.
 
मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुंबईत भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचा लोकापर्ण सोहळा बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी म्हणजे आज (ता.23) होत आहे. या पुतळ्याचे लोकापर्ण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्ताने सर्व पक्षीय नेते आज एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर किशोरी पेडणेकर आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, वस्त्रउद्योगमंत्री अस्लम शेख आदी उपस्थित राहणार आहेत.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख