पिंपरी : पिंपरी-चिंचवड स्थायी समिती सदस्यत्वासाठी डावलल्या गेलेल्या शिवसेनेच्या नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांना त्याची नुकसानभरपाई म्हणून पालिकेतील पक्षाचे गटनेतेपद दिले जाण्याची दाट शक्यता आहे. पक्षश्रेष्ठींनी दिलेले त्यांचे नाव डावलून राहूल कलाटे यांनी मीनल यादव यांना ही संधी दिल्याने कलाटेंचे गटनेतेपद पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल नुकतेच काढून घेण्यात आले आहे.
कलाटेंच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर चिंचवडे या अधिक दावेदार ठरत आहेत. पक्षाच्या नऊ नगरसेवकांपैकी फक्त दोघेच दुसऱ्यांदा निवडून आलेले असून त्यात चिंचवडे आहेत. तर, दुसरे निलेश बारणे हे पक्षाचे खासदार श्रीरंगअप्पा बारणे यांचे पूतणे आहेत. घराणेशाहीचा आरोप होण्याच्या शक्यतेमुळे त्यांची निवड होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे चिंचवडे यांचा दावा अधिक मजबूत झाला आहे.
मुख्यमंत्र्यांना त्रास देणाऱ्या भाजपला सोबत का घेतले? खैरे नाराज
तसेच त्या बारणे यांच्या अत्यंत जवळचे असलेले जिल्हाप्रमुख (मावळ) गजानन बारणे यांच्या पत्नी आहेत. ही बाबही त्यांच्या जमेची ठरणार आहे. त्यात त्यांची स्थायीची संधी हुकल्याने नुकसान भरपाई म्हणून त्यांना गटनेतेपद दिले जाईल, याला पक्षातीलच एका वरिष्ठ जबाबदार पदाधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. तसे झाले, तर सुलभा उबाळे यांच्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेचे गटनेतेपद महिलेकडे जाणार आहे. उबाळेंचा प्रभाग शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघात होता. तर, चिंचवडेचा तो चिंचवड मतदारसंघात आहे.
शिवसेनेत लेटरबॉम्ब : नाराज नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत; पदाधिकाऱ्यांचा श्रेष्ठींना इशारा
पिंपरी : स्थायी समिती सदस्य निवडीवरून पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेत सुरू झालेले वादळ गटनेतेपदाचा राजीनामा घेतल्यानंतरही शमलेले नाही. उलट, ह्या नाराजी, कुरघोडी व गटबाजीचा दुसरा अंक आता सुरू झाला आहे. लोकसभा व विधानसभाला पक्षाच्या उमेदवाराविरोधात काम केलेल्या नगरसेविकेला स्थायी सदस्यत्व बहाल केल्याने त्यांचा स्थायीचा राजीनामा घेण्याची मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख, महिला आघाडीच्या शहरप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांनी केली आहे. या प्रकरणावरून पक्षाच्या नगरसेवकांमध्ये नाराजी असून त्याचा मोठा फटका आगामी पालिका निवडणुकीत बसू शकतो, असा घरचा आहेरही त्यांनी दिला आहे.
भाजी विकून पोट भरणारा झाला नगरपालिकेचा अध्यक्ष
पक्षश्रेष्ठींनी सुचविलेले अश्विनी चिंचवडे यांचे नाव डावलून शिवसेनेचे पिंपरी पालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांनी आपल्या मर्जीतील नगरसेविका मीनल यादव यांची वर्णी गेल्या महिन्यात स्थायी समितीवर लावली होती. त्याबद्दल पक्षशिस्त मोडल्याचा ठपका ठेवत नुकताच कलाटे यांचा राजीनामा पक्षाने घेतला. मात्र, तो घेण्यास विलंब झाल्याबद्दल पक्षातील नाराजी व गटबाजी उफाळून आली होती. शहरप्रमुख योगेश बाबर, शहर महिला संघटिका ऊर्मिला काळभोर व जिल्हाप्रमुख (मावळ) गजानन चिंचवडे यांनी नुकत्याच काढलेल्या प्रसिद्धीपत्रकाने त्याला स्पष्ट दुजोरा दिला आहे.

