राष्ट्रवादीच्या शिलवंत-धर यांचे नगरसेवकपद रद्दसाठी कोर्टात जाण्याचा शिवसेनेचा इशारा 

महाविकास आघाडीत आलबेल नसल्याचे पिंपरी-चिंचवडमध्ये दिसून आले आहे.
राष्ट्रवादीच्या शिलवंत-धर यांचे नगरसेवकपद रद्दसाठी कोर्टात जाण्याचा शिवसेनेचा इशारा 
Shiv Sena warns to go to court to cancel NCP's Shilwant-Dhar's corporator post

पिंपरी : रक्ताच्या जवळच्या नातेवाईकांनी (भाऊ व पती) महापालिकेची निविदा भरल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पिंपरी-चिंचवडमधील नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी शिवसेनाप्रणित युवा सेनेचे पुणे जिल्हा समन्वयक जितेंद्र ननावरे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. यातून महाविकास आघाडीत आलबेल नसल्याचे पिंपरी-चिंचवडमध्ये दिसून आले आहे. दरम्यान, हा दुरावा महापालिकेला निवडणुकीला आघाडी राहिली, तर जागावाटपातून आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. 

नगरसेवकाच्या कुटुंबातील सदस्याने निविदा प्रक्रियेत भाग घेतला, तर संबंधित नगरसेवकाचे पद कायद्याने रद्द होते, अशी तरतूद महापालिका कायद्यात आहे. नगरसेविका शिलवंत-धर यांचे भाऊ आणि पती संचालक असलेल्या कंपनीने पिंपरी पालिकेची निविदा भरून एक लाख मास्क पुरविले असल्याने धर यांचे नगरसेवकपद आपोआप रद्द होते. त्यामुळे तशी मागणी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केल्याचे ननावरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांनी महापालिका कायद्याचे उल्लंघन केले असल्याने त्या पदावर राहण्यास अपात्र ठरतात, असे ननावरे म्हणाले. येत्या सात दिवसांत याबाबतीत निर्णय घेतला नाही, तर न्यायालयात जाऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

दरम्यान, युवा सेनेचे ननावरे यांचे आरोप चुकीचे असून त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे, अशी प्रतिक्रिया धर यांनी दिली. तसेच, ज्यांच्याकडे त्यांनी तक्रार दिली आहे, त्यांच्याकडेच म्हणणे मांडू, असेही त्या म्हणाल्या. 

राज्याच्या सत्तेतील तीन पक्षांपैकी शिवसेना आणि राष्ट्रवादीतच अधिक सख्य असल्याचे आढळून आले आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड यानिमित्ताने त्याला अपवाद ठरले आहे. हे मतभेद 11 महिन्यांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत आघाडी राहिली, तर जागा वाटपावरून आणखी वाढण्याची भीती शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in