पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून स्वबळाची तयारी.. 

पिंपरी पालिकेत सध्या भाजप सत्तेत आहे.तर,राज्यात शिवसेना,राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या आघाडीची सत्ता आहे
पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून स्वबळाची तयारी.. 
shivsena7.png

पिंपरी  : पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याची जोरदार तयारी शिवसेनेने सुरु केली आहे. त्यासाठी मिशन २०२२ सुरु केले आहे. त्याअतर्गत खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रभागनिहाय बैठकांचा धडाका लावला आहे. रविवारी झालेल्या अशाच बैठकीत शहरवासीयांनी राष्ट्रवादी, भाजपची सत्ता अनुभवली, आता ते शिवसेनेला साथ देतील, असा आशावाद शिवसेनेचे शहरातील पिंपरी राखीव मतदारसंघातील माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी व्यक्त केल्याने एकला चलो रे च्या शिवसेनेच्या भूमिकेला बळ मिळाले आहे.

भाजप,राष्ट्रवादीच्या पालिकेतील सत्ताकाळात जनतेच्या पदरात काहीच पडले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेत भ्रष्टाचार असून आत्ता तर तो आणखी वाढला आहे, असा हल्लाबोल या बैठकीत भाजपवर करताना अॅड. चाबूकस्वार यांनी राष्ट्रवादी या राज्याच्या सत्तेतील सहकाऱ्यालाही लक्ष्य केलं. राष्ट्रवादी व भाजपच्या भ्रष्टाचारी कारभारामुळे आगामी पालिका निवडणुकीत शहरातील नागरिक नक्कीच शिवसेनेला साथ देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्यावर्षी विधानसभेला माझा पराभव झाला असला, तरी, त्याने मी खचून गेलो नाही. उलट जोमाने कामाला लागलो असून तो पराभव पालिका निवडणुकीत भरून काढायचा आहे. 

पक्षाचे जास्तीत-जास्त नगरसेवक महापालिकेत निवडून आणायचे आहेत, असे चाबूरस्वार म्हणाले.मावळचे खासदार श्रीरंग बारणे, महिला संघटिका अॅड. उर्मिला काळभोर, माजी नगरसेवक अनंत को-हाळे, प्रतीक झुंबरे गुलाब गरूड,माधव मुळे,किशोर केसवानी,सावल तेतलानी,  राजाराम कुदळे, अमर कापसे, अनिल पारच्या आदी पदाधिकारी,कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. शहरातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालिकेत शिवसेनेची सत्ता आवश्यक आहे,असे बारणे यावेळी म्हणाले.

पिंपरी पालिकेत सध्या भाजप सत्तेत आहे.तर,राज्यात शिवसेना,राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणूक आघाडीने एकत्रित लढण्याची चर्चा सुरु झाली आहे. नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत आघाडीला घवघवीत यश मिळाल्याने त्याची पुनरावृत्ती महापालिका निवडणुकीत करण्याचा आघाडीच्या नेत्यांचा बेत आहे. त्याबाबत वरून आदेश येताच एकत्र लढण्याची तयारी आहे. मात्र,तोपर्यंत एकट्यानेही लढण्याची तयारी आहे. म्हणून वरील वक्तव्य केल्याचा खुलासा अॅड. चाबूकस्वार यांनी काल सरकारनामाशी बोलताना केला.त्यासाठीच मिशन २०२२ सुरु केले असून त्याअंतर्गत सध्या प्रभाग बैठका सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in