पिंपरी : राज्यातील महापालिकांच्या आगामी निवडणुका राष्ट्रवादीबरोबर लढण्याची घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पुण्यात केल्याने पिंपरी-चिंचवडमधील स्वबळाच्या शिवसेनेच्या तयारीला आता ब्रेक लागणार आहे. त्यांनी सुरु केलेले शिवसेना मिशन २०२२ आता थांबवावे लागणार असून राष्ट्रवादीसह त्यांना हे मिशन आता एकत्रित पार पाडावे लागणार आहे. दरम्यान, यामुळे फुटीच्या उंबरठ्यावर असलेल्या पालिकेतील सत्ताधारी भाजपसमोर सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. तर, गतवेळी २०१७ ला हातातून निसटलेली सत्ता पुन्हा ताब्यात येण्याच्या राष्ट्रवादीच्या आशा यामुळे पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
गेल्या दोन महिन्यापासून शिवसेनेने एकला चलो रे ची तयारी म्हणून शहरात मिशन २०२२ सुरु केले होते. त्याअंतर्गत प्रभागनिहाय बैठकांचा धडाका खासदार श्रीरंग बारणे यांनी सुरु केला होता. आता, मात्र, ते थांबवावे लागणार आहे. त्याऐवजी राष्ट्रवादीसह हे मिशन त्यांना पुढे न्यावे लागणार आहे.
बॅंका विकल्या, संस्था मोडल्या, त्यांना राष्ट्रवादी घेण्याचा शिंदेचा अट्टाहास कशासाठी...
दरम्यान, या नव्या राजकीय घडामोडीवर भाष्य करताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ''ते म्हणाले. शिवसेनेकडून एकत्र लढण्याची भाषा झाली असली, तरी त्याबाबत आमचा निर्णय अजितदादाच घेतील. तो जे निर्णय घेतील, तो मान्य असेल. असा निर्णय झाला, तर, मात्र त्याचा शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा दोघांनाही फायदा होईल. भाजपविरोधी मतांची विभागणी यामुळे टळणार असल्याने निश्चीत फायदा होईल'', असे शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर यांनी सांगितले. सध्याच्या बदललेल्या राजकीय वातावरणात ही नवी युती म्हणजे दुधात साखर आहे'', असे ते म्हणाले. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी हा निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असून अद्याप तशी तिकडून कल्पना आली नसल्याचे सांगितले. तसेच पक्षवाढीसाठी बैठका चालूच राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
पूढील वर्षी फेब्रुवारीत पिंपरी पालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे. गतवर्षी राष्ट्रवादीला खिंडार पाडून भाजप पालिकेत प्रथमच सत्तेत आली. मात्र, गटतट तसेच संधी न मिळाल्याने भाजपमधील नाराज नगरसेवकांचा मोठा गट (अंदाजे पंधरा-वीस) या वर्षअखेरीस टर्म संपता संपता स्वगृही परतणार असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. तसे संकेत काही नगरसेवकांनी दिलेही आहेत. ते पक्षाच्या कार्यक्रमापासून अलिप्त राहू लागले आहेत. या नगरसेवकांची नाराजी दूर होत नाही, तेवढ्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती पालिका निवडणुकीसाठी झाल्याने भाजपची वाट आणखी बिकट झाली आहे.
महापालिका निवडणूक एकत्र लढविणार : संजय राऊत
आता त्यांना प्रथम आपले नगरसेवक व त्यानंतर सत्ता टिकवण्याचे इंद्रधनुष्य पेलावे लागणार आहे. कारण त्यांच्या राजवटीत पालिकेला कोट्यवधी रुपयांना ठेकेदारांनी फसविल्याप्रकरणी एक नव्हे, तर सात गुन्हे दाखल झाले आहेत. ठेकेदार काळ्या यादीत गेले आहेत. त्यानंतर कचरा घोटाळ्यात अर्ध्या शहराचा कचरा उचलणाऱ्या कंत्राटदराचे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई झाली आहे. ते कमी म्हणून की काय एकही रुग्ण दाखल व झालेल्या दोन कोरोना सेंटरला पालिकेने सव्वातीन कोटी रुपये दिले आहेत.
त्याजोडीने कोरोना खरेदीत कोट्यवधी रुपयांचा, तर स्मार्ट सिटीच्या कामात अडीचशे ते तीनशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोपही सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी केलेला आहे. असे गैरव्यवहार व आरोपांनी घेरलेल्या भाजपपुढे या नव्या राजकीय समीकरणामुळे मोठे आव्हान उभे राहिले आहे. प्रथम या आरोपातून सूटका करून घेत त्यांना पक्षांतर्गत नाराजी दूर करायची आहे. त्यानंतर एकोपा ठेवून त्यांना राष्ट्रवादी व शिवसेनेचा सामना आता करावा लागणार आहे.
Edited By - Amol Jaybhaye

