छूप्या इंदूर दौऱ्यामागे कोट्यवधींच्या डस्टबिन वाटपाचे षडयंत्र! - Shiv Sena corporator Rahul Kalate criticizes BJP  | Politics Marathi News - Sarkarnama

छूप्या इंदूर दौऱ्यामागे कोट्यवधींच्या डस्टबिन वाटपाचे षडयंत्र!

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 7 जुलै 2021

हा पॅटर्न पिंपरी-चिंचवडमध्ये राबविण्यात येणार असल्याचे जाहीर करून टाकले.  

पिंपरी : भाजप सत्ताधारी पिंपरी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांचा गेल्या आठवड्यातील छुप्या खासगी इंदूर दौऱ्यामागे कोट्यवधी रुपयांचे डस्टबीन वाटपाचे षडयंत्र असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी गटनेते राहूल कलाटे (Rahul Kalate) यांनी मंगळवारी (ता.६) केला. शिवसेना, मनसे व अपक्ष गटनेत्यांना डावलून फक्त राष्ट्रवादीच्याच गटनेत्याला घेऊन हा दौरा झाल्याने तो संशयाच्या भोवऱ्यात आला आहे. (ShivSena corporator Rahul Kalate criticizes BJP) 

हेही वाचा : मंत्रिमंडळाच्या मेगाविस्तारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची चतु:सूत्री

या दौऱ्यात सामील झालेल्या राज्य सरकारमधील मित्रपक्ष राष्ट्रवादीचे पालिकेतील गटनेते राजू मिसाळ यांना कलाटेनी लक्ष्य केले. या दौऱ्यात सहभागी होणार नाही असे आदल्या दिवशी सांगणारे मिसाळ दुसऱ्या दिवशी त्यात कसे सामील झाले, अशी खोचक विचारणा त्यांनी केली. त्यामुळे राज्य सरकारात आलबेल असले, तरी शिवसेना व राष्ट्रवादीत जसे पुणे जिल्ह्यात बिघाडी आहे, त्याचा प्रत्यय पिंपरी-चिंचवडमध्येही येत आहे. म्हणून त्याची चर्चा झाली.

लग्नासाठी हा खासगी दौरा होता, असे त्यात सामील झालेले स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले होते. प्रत्यक्षात ते इंदूर शहरातील कचरा वर्गीकरण पाहून आले. हे काम करणाऱ्या ठेकेदाराला पिंपरीतही हे काम आता दिले जाणार आहे. या दौऱ्यावरून आल्याानंतर मंगळवारी (ता.६) हे पदाधिकारी व त्यात सामील झालेल्या स्थायी समितीच्या इतर सदस्यांनी पत्रकार परिषद घेत इंदूरमधील कचरा विलगीकरण पॅटर्नचे कौतुक केले. 

हेही वाचा : वाजपेयी असते तर, या भाजप आमदारांना घरी पाठवले असेत!

एवढेच नाही, तर हा पॅटर्न पिंपरी-चिंचवडमध्ये राबविण्यात येणार असल्याचे जाहीर करून टाकले. त्यानंतर कलाटे यांनी या दौऱ्यावर सडकून टीका केली. शहर स्वच्छतेला अजिबात विरोध नसल्याचे सांगत दौरा गुपचूप करण्याला जोरदार आक्षेप त्यांनी घेतला. अशा दौऱ्याचे फलित नसते, असे सांगत त्यांनी शहर स्वच्छतेसाठी यापूर्वी झालेल्या अशाच दौऱ्याचा दाखला दिला. तो झाला आणि कोट्यवधी रुपयांच्या डस्टबीन वाटपाची निविदा निघाली. त्यामुळे आता पुन्हा या दौऱ्याची निष्पत्ती म्हणून करदात्यांवर असा कोट्यवधी रुपयांचा बोजा पडता कामा नये, असे ते म्हणाले. 

पालिकेत सत्तेत आल्यापासून गेल्या साडेचार वर्षात भाजपला शहरातील कचऱ्याचा प्रश्न सोडवता आला नाही. त्यांचे कचरा व्यवस्थापन फेल गेल्याने इंदूरचा दौरा केला का असा सवाल त्यांनी विचारला. सत्तेतून आता जाण्याची वेळ आली, तेव्हा त्यांची ही तडफड सुरु झाली आहे. दिवा विझताना जसा फडफडतो, तशी ही आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.  
Edited By - Amol Jaybhaye 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख