शरद पवारांचा थेट पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांना कारवाईसाठी फोन

पठारे याने ९ जुलै रोजी खांडेभराड यांना शरद पवारांच्या आवाजात गुरव याला फोन करायला लावला.
Sharad Pawar calls to pimpri CP krishnapraksh
Sharad Pawar calls to pimpri CP krishnapraksh

पिंपरी  ः चाकण (ता. खेड, जि. पुणे) येथील एका उद्योजकाला बेकायदा व्याजाच्या वसुलीसाठी आपल्या आवाजात एका भामट्याने फोन केल्याचे समजताच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थेट पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांना फोन करत त्याच्याविरुद्ध कारवाई करा, अशी सूचना केली. त्यानंतर पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवली आणि गुरव नावाचा भामटा आणि त्याचा बोलवता धनी पुण्यातील उद्योजक धीरज धनाजी पठारे (रा. यशवंतनगर, खराडी, पुणे) यांच्याविरुद्ध खंडणीसह आयटी अॅक्टनुसार चाकण पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. १२ ऑगस्ट) गुन्हा दाखल केला. (Sharad Pawar calls to pimpri CP krishnapraksh)

दरम्यान, मी सिल्वर ओकवरून शरद पवार बोलतोय, असे सांगत गुरव याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमारसिंह यांनाही बदलीसाठी फोन केला होता. त्याबाबत मुंबईत गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तेथे त्याला व त्याने दिलेल्या माहितीवरून किरण काकडे आणि पठारे अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून चाकणमधील प्रकरणही समजल्याने त्यांच्याविरुद्ध चाकण पोलिस ठाण्यातही गावदेवीसारखाच गुन्हा आज (ता. १२ ऑगस्ट) दाखल करण्यात आला. मुंबईच्या गुन्ह्यात आरोपींची पोलिस कोठडी संपताच चाकणच्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात येईल, असे कृष्णप्रकाश यांनी सांगितले.

चाकण येथील गुन्ह्यात उद्योजक प्रतापराव वामन खांडेभराड (वय ५४, रा. कडाचीवाडी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खांडेभराड यांनी आरोपी पठारेकडून २०११ मध्ये दीड कोटी रुपये व्याजाने घेतले होते. त्यापोटी त्यांची १३ एकर जमीन आरोपीने आपल्या नावावर करून घेतली होती. त्यानंतरही व्याज, चक्रवाढव्याज अशा पाच कोटींसाठी तो खांडेभराड, त्यांची पत्नी नंदा, मेव्हणा नवनाथ अरगडे यांना जानेवारी महिन्यापासून धमकी देत होता. 

त्याने ३० मे रोजी खांडेभराड यांच्या घरी जाऊन त्यांना पाच कोटींसाठी पुन्हा धमकावले होते. ‘हे पैसे दे; नाही तर माझ्याशी गाठ आहे, बघून घेईन, दोघांना जिवंत सोडणार नाही, संपवून टाकीन, अशी धमकी त्याने दिली होती. तर, पठारे याने ९ जुलै रोजी खांडेभराड यांना शरद पवारांच्या आवाजात गुरव याला फोन करायला लावला. धीरज पठारे याचे पैसे देऊन टाक आणि प्रकरण मिटवून टाक, असे शरद पवारांचा आवाज काढत गुरव याने खांडेभराडांना सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com