विलास लांडेंना पुन्हा ऍक्‍टिव्ह होण्याचा पवारांचा सल्ला 

बारामतीनंतर पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. परंतु मोदी लाटेत हा बुरुज ढासळला. लक्ष्मण जगताप, महेश लांडगेया आमदारांनीही पक्ष सोडला. महापालिकेतील सत्ताही गेली. त्यातच दत्ता साने यांच्यासारखा मोठा नेता पक्षाला गमवावा लागला. त्यामुळे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे.
विलास लांडेंना पुन्हा ऍक्‍टिव्ह होण्याचा पवारांचा सल्ला 
Sharad Pawar advises Vilas Lande to be active again

आळंदी (पुणे) : बारामतीनंतर पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. परंतु मोदी लाटेत हा बुरुज ढासळला. लक्ष्मण जगताप, महेश लांडगे या आमदारांनीही पक्ष सोडला. महापालिकेतील सत्ताही गेली. त्यातच दत्ता साने यांच्यासारखा मोठा नेता पक्षाला गमवावा लागला. त्यामुळे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे.

माजी आमदार विलास लांडे यांच्यासारखा तगडा नेता शहरात पक्षाकडे नसल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आजच्या (ता. 7 जुलै) भेटीनंतर पिंपरी चिंचवडमधील राजकारणाची धुरा आगामी काळात लांडे यांच्याकडेच राहील, अशी अटकळ बांधली जात आहे. याच भेटीत पवारांनी त्यांना ऍक्‍टिव्ह होण्याची सल्लाही दिला आहे. 

माजी आमदार विलास लांडे यांचे वडील विठोबा सोनबा लांडे यांचे 30 जून रोजी निधन झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (ता. 7 जुलै) सकाळी लांडे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. लांडे कुटुंबीयांचे सांत्वन केले. लांडे यांचे वडील विठोबा लांडे आणि त्यांच्यातील स्नेहबंध याबाबतच्या आठवणीही पवार यांनी जागृत केल्या. 

मागील काही आठवड्यांपूर्वी माजी आमदार विलास लांडे यांच्या आई इंदूबाई लांडे यांचे निधन झाले, तेव्हा पवारांनी लांडे यांची मोबाइलवरून विचारपूस केली होती. बोलता बोलता लांडे यांनी वडिलांचे वय एकशे दोन असल्याचे सांगितले होते.

त्यावेळी पवार म्हणाले होते, "काय तुमच्या वडिलांचे वय 102 आहे. पुढच्या वेळी मला वडिलांची भेट घेण्यासाठी घेऊन जा. मला आठवतेय ते. माझी पहिली निवडणूक होती आणि तुमच्या घराच्या बाहेर ओटा असायचा. त्यावर तुमचे वडील बसलेले असायचे. आजूबाजूला आणखी काही लोक बसलेले असत. मला माझ्या राजकारणात तुमच्या वडिलांनी भक्कमपणे साथ दिली.' असे सांगून पवार यांनी माजी आमदार विलास लांडे यांच्याशी आई इंदूबाई लांडे यांचे निधन झाले, तेव्हा मोबाईलवरून जुन्या आठवणी जाग्या केल्या होत्या. तसेच, पुढच्या वेळी मला वडिलांची भेट घेण्यासाठी घेऊन जा, असेही सांगितले होते.

मात्र, पवारांची ती इच्छा मात्र पूर्ण होऊ शकली नाही. कारण, 30 जून रोजी विलास लांडे यांचे वडिल विठोबा लांडे यांचे निधन झाले होते. दरम्यान, मंगळवारी सकाळी पवारांनी भोसरीतील विलास लांडे यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वन करत सहवेदना व्यक्त केल्या. 

या वेळी ते म्हणाले, "अध्यात्मिक, वारकरी, राजकीय, कुस्ती आणि सांस्कृतिक क्षेत्रात रमलेले आई-वडिल तुम्हाला लाभले, विलासराव तुमचे भाग्यच आहे. तुमच्या वडिलांनी सर्वच क्षेत्रात काम केले, अशा शब्दांत शरद पवार यांनी विलास लांडे आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले. 

पवारांवरील बातम्यांची कात्रणे 

लांडे यांच्या वडिलांनी आजपर्यंत शरद पवार यांच्याविषयी विविध वृत्तपत्रामंध्ये 1972 ते 2019 पर्यंत छापून आलेली कात्रणे जपून ठेवली होती. त्याची स्वतंत्र लायब्ररीही त्यांनी बनविली होती. शरद पवार आज घरी आल्यानंतर लांडे यांनी वडिलांनी जमवलेली बातम्यांची कात्रणे पवार साहेबांना दाखवली. या वेळी आपल्याबद्दलच्या विविध बातम्यांचा (सभा, राजकिय घडामोडी, आरोपांच्या फैरी अशा विविध विषयांच्या बातम्या) संग्रह पाहून पवारांनाही नवल वाटले. त्यातली मोजकी आणि महत्वाची कात्रणे पवारसाहेबांना दिल्याची माहिती लांडे यांचे भाचे सुधीर मुंगसे यांनी दिली. 

धुरा लांडे यांच्यावर? 

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे नुकतेच निधन झाले. साने यांच्या निधनाने पिंपरी महापालिकेच्या आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राजकीय पातळीवर पोकळी निर्माण झाली आहे. त्याचबरोबर आईच्या निधनानंतर अवघ्या काही आठवड्यातच वडिलांचे निधन झाल्याने विलास लांडे यांच्यावरही दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, शरद पवार हे आज साने आणि लांडे दोन्ही कुटुंबीयांचे सांत्वनासाठी आले होते. खचून न जाता धैर्याने सामोरे जात जनतेची सेवा करण्यास त्यांनी सांगितले. कुटुंबाबरोबर समाजाची जबाबदारी दोन्ही कुटुंबांवर आली आहे.

लोकांच्या सुखदुःखात साथ देत त्यांची व्यक्तिगत भेट घेवून राजकीयच नाही तर कौटुंबिक नाते कसे जोडायचे, याचा वस्तुपाठच आज पवार यांनी भावी पिढीला घालून दिल्याची चर्चा पिंपरीतील राजकिय वर्तुळात नव्याने पदार्पण करणाऱ्या राजकिय कार्यकर्त्यांमधे होती. विधानसभा निवडणुकीनंतर लांडे पक्षीय राजकारणापासून बाजूलाच होते. मात्र साने यांच्या निधनानंतर पक्षामधे पोकळी निर्माण झाली आहे. लांडे यांच्याशिवाय तगडा नेता कोणी नसल्याने आणि पवारांच्या भेटीनंतर शहरातील राजकारणाची धुरा यापुढे लांडे यांच्याकडे येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

शरद पवारसाहेबांची आजची भेट ही कौटुंबिक आणि सांत्वन करण्यासाठी होती. पवार साहेब म्हणजे प्रत्येकाच्या सुखदुःखात आपल्या कार्यकर्त्यांना नेहमी आपलसे करणारे आहेत. त्यांच्या भेटीने एक आधार मिळाला. साहेबांनी आई-वडिलांविषयी विचारपूस केली. 
विलास लांडे, माजी आमदार 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in