मावळात सात ग्रामपंचायती बिनविरोध  - Seven gram panchayats unopposed in Maval taluka | Politics Marathi News - Sarkarnama

मावळात सात ग्रामपंचायती बिनविरोध 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 5 जानेवारी 2021

या सात गावांना दीड कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.

पिंपरी : मावळ (जि. पुणे) तालुक्‍यातील आढे, दारुंब्रे, नवलाख उंब्रे, पाचाणे, कुसगाव पमा, येलघोळ आणि आंबेगाव अशा सात ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. मावळातील सात ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्‍यता असे वृत्त "सरकारनामा'ने दिले होते. ते अचूक ठरले. 

दरम्यान, ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्याने या सात गावांना दीड कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. मावळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी बिनविरोध निवडणूक करणाऱ्या प्रत्येक ग्रामपंचायतीला 21 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी काल चित्र स्पष्ट झाले. त्यात वरील सात गावे बिनविरोध झाल्याचे मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे आणि नायब तहसीलदार चाटे यांनी सांगितले. 

मावळातील 57 ग्रामपंचायतींच्या 515 जागांपैकी 198 जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित 317 जागांसाठी 723 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली. दरम्यान, सोमाटणे, माळवाडी व मोरवे येथे प्रत्येकी एका जागेसाठी, तर खांडी व आपटी येथे प्रत्येकी दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे. 

मावळात 515 जागांसाठी एक हजार 582 जणांचे एक हजार 588 अर्ज वैध ठरले होते. सोमवारी उमेदवारी अर्ज माघारीचा दिवस होता. दिवसभरात 667 जणांनी माघार घेतली. नवलाख उंब्रे, येलघोळ, आंबेगाव, पाचाणे, कुसगाव पमा, दारुंब्रे व आढे या सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. इतर ग्रामपंचायतींमधील 139 जागा बिनविरोध झाल्या. सोमाटणे येथील 13 पैकी 12, माळवाडी येथील 11 पैकी 10 तर मोरवे येथील सात पैकी सहा जागा बिनविरोध झाल्या. सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने आता 50 ग्रामपंचायतींच्या 317 जागांसाठी 723 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख