खबरदार : कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले नसल्यास वेतनही नाही

दोन्हीडोस घेतलेल्यांनाजुलै महिन्याचा पगार विनाअडथळा मिळणार आहे.
खबरदार : कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले नसल्यास वेतनही नाही
Salary will be withheld if both doses of corona vaccine are not taken

पिंपरी : कोरोना (Covid-19) संसर्ग कमी करण्यासाठी जगभरात लसीकरणावर भर दिला जात आहे. भारतात पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस दिली गेली. आता 18 वर्षांपुढील सर्वांना लस दिली जात आहे. पण अजूनही अनेक फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी लस घेतली नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर वेतन कपातीची कुऱ्हाड पडण्याची  शक्यता आहे. (Salary will be withheld if both doses of corona vaccine are not taken)

पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) महानगरपालिकेच्या बहूतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अद्याप कोरोनाची लस घेतली नसल्याचे आढळले आहे. लोका सांगे ब्रम्हज्ञान..सारखा हा धक्कादायक व धोकादायक प्रकार निदर्शनास येताच पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी हे दोन्ही डोस न घेतलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन रोखण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे. सेवानिवृत्तांचाही त्यात अपवाद करण्यात आलेला नाही.

पालिकेच्या आस्थापनेसह मानधनावरील अधिकारी व कर्मचारी आणि ठेकेदारांच्याही कामगारांना २० जुलैपर्यंत लसीचे दोन्ही डोस घेण्यास बजावण्यास आले आहे. नाहीतर त्यांचा जुलै महिन्याचा पगार स्थगित ठेवण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यात दोनदा लेखी आदेश देऊनही अनेक पालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ही लस घेतली नसल्याचे निदर्शनास आल्याने आयुक्तांना हे कडक पाऊल उचलावे लागले आहे. 

लसीकरण करून घेण्याबाबत पहिला आदेश त्यांनी ३१ मार्च व नंतर ६ मे रोजी काढला होता. मात्र, त्यानंतरही बहूतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही लस न घेतल्याचे आढळल्याने नुकताच (ता. २५) तिसरा आदेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार आपापल्या खात्यात लसीकरण करुन घेण्याची जबाबदारी सबंधित विभागप्रमुखांवर आय़ुक्तांनी टाकली आहे. स्टाफसह मानधनावरील आणि कंत्राटी कामगारांचेही (ठेकेदारांकडील) लसीकरण २० जुलैपर्यंत झाले नाही, तर त्यांचा पगार स्थगित ठेवण्याचा मानस आयुक्तांनी बोलून दाखवला आहे.

दरम्यान, पालिकेच्या सात हजार चारशे ७९ अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी कोरोना योद्धे असलेल्या वैद्यकीय विभागातील अधिकारी तथा कर्मचारी म्हणजे डॉक्टर, नर्सेस, आया, वॉर्डबॉय़ आदीनींच दोन्हीही डोस घेतला आहे. त्यांना, जुलै महिन्याचा पगार विनाअडथळा मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in