सैराटचा 'परश्या' पोलिसांच्या जाळ्यात ; महिलेला लाखोंचा गंडा

त्याने अहमदनगर येथील एका महिलेसोबत मैत्री करून तिचा विश्वास संपादन केला. आपण आकाश म्हणजेच सैराटचा परश्या असल्याचे सांगितले.
crime
crime

पिंपरी : माझ्या वडिलांना अर्धांग वायूचा झटका आला असून उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सैराटच्या 'परश्या' ने फेसबुकवरून सांगितले. त्यावरून त्याने एका महिलेला लाखो रूपयांचा गंडा घातला. पण हा बनावट 'परश्या' पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. हा परश्या आकाश ठोसर नसून पिंपरी-चिंचवडच्या एका माजी दिवंगत नगरसेवकाचा मुलगा आहे.  शिवदर्शन उर्फ शिवतेज नेताजी चव्हाण (वय 25 राहणार मोहननगर , चिंचवड स्टेशन) असे त्याचे नाव आहे. मौज मजा करण्यासाठी त्याने हे केल्याचे पोलिसांना सांगितले.


सैराटचा अभिनेता आकाश ठोसर (परश्या) यांच्या नावाने शिवदर्शन याने फेसबुकवर बनावट अकाउंट तयार केले. आपण आकाश म्हणजेच सैराटचा परश्या असल्याचे सांगितले.अहमदनगर येथील एका महिलेसोबत मैत्री करून तिचा विश्वास संपादन केला. ही महिला परश्याची फॅन होती. तिने परश्याची जन्मतारीख, तो शिकलेल्या शाळेचे नाव, आवडीनिवडी आदी गोष्टी फेसबुकद्वारे त्याला विचारल्या. परश्याची सर्व माहिती शिवदर्शनला होती. महिलेच्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याने बरोबर दिली. त्यामुळे तिला खात्री पटली. तिने, 'तू आता कुठे आहेस,' असे विचारले असताना आरोपी तिला आपण शुटिंगमध्ये असल्याचे सांगायचा.

महिलेला खात्री पटण्यासाठी आकाश ठोसरचे इंटरनेटवरील शूटिंगचे फोटो त्यांना पाठवायचा. शिवदर्शन याने काही दिवसापूर्वी फेसबुकवरून आकाश ठोसरच्या नावाने महिलेकडे पैशांची मागणी केली. आपल्या वडिलांना अर्धांग वायूचा झटका आला आहे. त्यांच्या उपचारासाठी पैशांची आवश्यकता असल्याचे त्याने सांगितले. मला मिळालेल्या पैशात गाडी, बंगला घेतला. त्यामुळे सध्या पैशांची खूप गरज असल्याचे त्याने तिला सांगितले.  


मौज मजा करण्यासाठी हा मार्ग निवडला

'परश्या'ची गरज लक्षात घेऊन संबंधित महिलेने पैसे देण्याचे ठरविले. शिवदर्शन काही दिवसांनी अहमदनगरला गेला. आकाशाचा मित्र असल्याचे सांगत त्याने पैसे घेण्यासाठी पाठविले असल्याचे सांगितले. त्या महिलेने मंगळसूत्र व सोन्याची अंगठी असा एक लाख 40 हजार रुपयांचा ऐवज आरोपीकडे दिला. काही दिवसानंतर त्याने फेसबुकद्वारे अथवा प्रत्यक्ष कसलाही संपर्क ठेवला नाही.फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी चिंचवड येथून शिवदर्शन याला ताब्यात घेतले. तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिली.  मौज मजा करण्यासाठी पैसे नसल्याने अशा प्रकारे बनावट फेसबुकद्वारे गंडा घालण्याचा मार्ग निवडल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याच्याकडून ऐवज हस्तगत केला.
 बारावीपर्यंत त्याचे शिक्षण झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com