अस्तित्वात नसलेल्या कोरोना सेंटरला पाच कोटी देण्याचा घाट 
Rs 5 crore to non-existent Corona Center .jpg

अस्तित्वात नसलेल्या कोरोना सेंटरला पाच कोटी देण्याचा घाट 

कोरोनासाठी अवाच्या सव्वा भावाने पिंपरी-चिंचवड महापालिकेने साहित्य खरेदी केल्याचा आरोप अगोदरच झाला आहे.

पिंपरी : कोरोनासाठी अवाच्या सव्वा भावाने पिंपरी-चिंचवड महापालिकेने साहित्य खरेदी केल्याचा आरोप अगोदरच झाला आहे. त्यात आता, तर करारच न झालेल्या व एकही रुग्ण दाखल नसलेल्या दोन कोरोना सेंटरला सव्वापाच कोटी रुपये देण्याचा विषय मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर आला आहे. या दोन सेंटरची नावे सुद्धा शहरवासियांनी ऐकलेली नसून, तेथे एकाही कोरोना रुग्णाने उपचार घेतलेले नाहीत.

दरम्यान, आतापर्यंत तब्बल २६० कोटी रुपये पालिकेचा कोरोनावर खर्च झाला, असून त्यातील खूप मोठ्या प्रमाणावर तो वायफळ व अनाठायी झाल्याची चर्चा आहे. पालिकेला कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्याच्या वरील प्रकारात पालिकेच्याच एका वरिष्ठ अधिकाऱ्याची मिलीभगत असल्याचे कळते. मात्र, पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या ध्यानात हा संशयास्पद घोटाळा आल्याने त्यांनी हे बिले देणे थांबवले आहे. 

सदर संस्थेशी करारच झालेला नसून त्यामुळे त्यांनी अनामत रक्कमही भरली नसल्याने हे बिल देण्याची गरजच काय असा शेरा त्यांनी मारला आहे. कोरोनाची शहरात सुरु झालेली अनेक सेंटर काही नगरसेवकांच्या भागीदारीत असून त्यांना कोट्यवधी रुपयांची बिले आतापर्यंत देण्यात आली आहेत. मात्र, करारच झाला नसताना तसेच एकही कोरोनाचा रुग्ण दाखल नसतानाही कोट्यवधी रुपये लाटण्याचा प्रकार म्हणजे जनतेच्या पैशावर डल्ला मारण्यासारखे आहे. त्यामुळे हे बिल देऊ नये, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे यांनी पत्रकारपरिषेदत (ता ३ फेब्रुवारी) रोजी केली. खरी कोरोना बिले देण्याला आक्षेप नाही, मात्र अशी खोटी  व पालिकेला गंडा घालणारी बिले देण्यात येऊ नयेत, अशी मागणी त्यांनी केली.  

दरम्यान, कालच्या स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी असलेला हा विषय तहकूब करण्यात आला असून आता सोमवारी होणाऱ्या बैठकीत त्यावर निर्णय होणार आहे. या स्थायी समितीची मुदत या महिनाअखेर संपत असल्याने त्यांनी असे विषय मंजुरीचा धडाका लावला आहे. सध्या ती कोटीच्या कोटी उड्डाणे भरत असून कोरोना लॉकडाऊनचा बॅकलॉग भरून काढीत आहे. मात्र, त्यामुळे जनतेच्या कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होणारा हा तहकूब विषय सोमवारी मंजूर होण्याचीच शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण स्थायीतील एका सदस्याचे त्यात लागेबांधे असल्याचे समजते.

अडीच महिन्याच्या न केलेल्या कामापोटी करारच न झालेल्या भोसरी येथील रामस्मृती मंगल कार्यालय आणि हिरा लॉन्स या दोन कोविड सेंटरनी (प्रत्येकी दोन कोटी ६३ लाख ३० हजार चारशे रुपये) पाच कोटी २६ लाख साठ हजार आठशे रुपयांचे बिल ही सेंटर चालविणाऱ्या स्पर्श हॉस्पिटलचे सीईओ डॉ. अमोल हळकुंदे यांनी पालिकेला दिले आहे. मात्र, करारच न झाल्याने व परिणामी अनामत न भरलेल्या स्पर्श हॉस्पिटलने दिलेले हे कोट्यवधी रुपयांचे बिल ही पालिकेची फसवणूक असल्याचा अहवाल पालिकेच्या भोसरी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्याने आयुक्तांनी हे बिल रोखले आहे. तरीही ते सोमवारी स्थायी मंजूर करते का याकडे लक्ष लागले आहे. ही बाब अतिशय गंभीर असून नियमाप्रमाणे डॉ. हळकुंदेविरुद्ध कारवाई व्हावी, असे मतही या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे.

Edited By - Amol Jaybhaye  

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in