उद्योगनगरीची श्रीमंत महापालिका पाळीव प्राण्यांचे दफन सशुल्क करणार.. 

मृत पाळीव प्राण्यांसाठी दफनभूमीची सेवा आता सशुल्क करण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्रत्येक मृत कुत्रा व मांजराच्या दफनासाठी (दहन) दोन हजार रुपये आकारण्याचा पालिकेचा प्रस्ताव आहे.
उद्योगनगरीची श्रीमंत महापालिका पाळीव प्राण्यांचे दफन सशुल्क करणार.. 
pet45.jpg

पिंपरी : कोराना महामारीमुळे श्रीमंत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकाही जेरीस आली आहे. त्यामुळे आतापर्यंत छोट्या मृत पाळीव प्राण्यांसाठीची (कुत्री,मांजरी) दफनभूमीची सेवा तिने आता सशुल्क करण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्रत्येक मृत कुत्रा व मांजराच्या दफनासाठी (दहन) दोन हजार रुपये आकारण्याचा पालिकेचा प्रस्ताव आहे. स्थायी समिती व नंतर सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे. दरम्यान,शहरातील रहिवाशांसाठी स्मशानभूमीची सेवा, मात्र अद्याप मोफत आहे.

मोठ्या मृत जनावरांची विल्हेवाट पालिकेच्या आठ प्रभाग स्तरावर लावली जाते. तर, कुत्रा व मांजर या छोट्या पाळीव मृत प्राण्यांसाठी पालिकेची स्वतंत्र अशी दफनभूमी (दहनभूमी) शहराच्या मध्यवर्ती भागात नेहरुनगर येथे आहे. तेथे या प्राण्यांसाठी दहनमशीन आहे. पाळीव प्राण्यांचे दहन तेथे मोफत आहे. मात्र, त्यावरील खर्च आता वाढल्याने ही सेवा सशुल्क करण्याचे पालिकेने आता ठरवले आहे. पालिका हद्दीतील मृत कुत्रा व मांजराच्या दफन तथा दहन सेवेसाठी आता दोन हजार रुपये मोजावे लागणार आहे. हद्दीबाहेरील या प्राण्यांना अशी सेवा देण्यासाठी त्यांच्या मालकांकडून तीन हजार रुपये घेण्याचा हा विषय आहे. तो मंजुरीसाठी आजच्या स्थायी समितीच्या अजेंड्यावर आहे.

शहरात हजारोंच्या संख्येने पाळीव प्राणी आहेत. पण,फक्त पाचशेचीच नोंद पालिकेकडे असल्याची माहिती पालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी अरुण दगडे यांनी आज सरकारनामाला दिली. या नोंदणीकृत छोट्या पाळीव प्राण्यांच्या (कुत्री)  जोडीने शहरात हजारो भटकी,मोकाट व बिनवारस जनावरेही (त्यात गाई,म्हशी आदी मोठी जनावरे) आहेत. त्यांचा मोठा उपद्रव आहे. 

त्यातील सरासरी दररोज एक पाळीव प्राणी (त्यातही कुत्रा) मृत होत आहे. अशारितीने महिन्याला तीस पाळीव मृत प्राणी पालिकेच्या छोट्या प्राण्यांसाठीच्या दफनभूमीत येतात. त्यांच्या दहनावर पन्नास हजार रुपये महिन्याला खर्च होत आहेत. गेल्या सव्वातीन वर्षात तेथे १,३०९ मृत प्राण्यांचे दहन झाल्याची माहिती पालिकेतून देण्यात आली. पाळीव प्राण्यांच्या जोडीने  शहरातील प्राणीप्रेमी हे भटके, मोकाट,बिनवारस मृत प्राणीही या दफनभूमीत आणतात. नाईलाजाने त्यांचेही दहन करावे लागते,असे पालिकेचे आरोग्य वैद्यकीय डॉ. अनिल रॉय यांनी सांगितले.त्यातूनच ही सेवा सशुल्क करण्याचे पालिकेने ठरवले आहे.  

 Edited  by : Mangesh Mahale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in