राजसाहेबांच्या करिश्म्यावर आम्ही एकाचे १२ करु 

स्थापनेनंतर लगेच मोठी झेप घेतलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नंतर उतरती कळा लागली.
राजसाहेबांच्या करिश्म्यावर आम्ही एकाचे १२ करु 
Raj Thackeray, .jpg

पिंपरी : स्थापनेनंतर लगेच मोठी झेप घेतलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नंतर उतरती कळा लागली. मनसेचा हाच आलेख उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्येही राहिला. मात्र, राज ठाकरेंची क्रेझ कायम असल्याने पुन्हा झेप घेऊ आणि एकाचे बारा नगरसेवक पिंपरीत करू, असा दावा पक्षाचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी पक्षाच्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त 'सरकारनामा'शी बोलताना केला.

मनसेची स्थापना २००६ ला झाल्यानंतर पक्षाने लगेच दुसऱ्या वर्षी आलेली पिंपरी पालिकेची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत ३५ उमेदवार उभे केले होते. मात्र, यश मिळाले नाही. त्यानंतरच्या २०१२ च्या निवडणुकीत ६५ पैकी चारजण निवडून आले, तर २०१७ ला सत्तर जागा लढवून फक्त एक नगरसेवक निवडूण आला.  

दरम्यान, पिंपरीतच नाही, तर राज्यात पक्षाची क्रेझ कमी होऊ लागली होती. त्याचा फटका पक्षाचे लोकप्रतिनिधी कमी निवडून येऊ लागले. हा आलेख विधानसभेलाही राहिला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे एकमेव आमदार राजू पाटील कल्याण ग्रामीणमधून विजयी झाले. त्याअगोदर  २०१४ मध्येही त्यांचा एकच आमदार होता. जुन्नरमधून शरद सोनवणे निवडून आले होते. नंतर त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. तर, स्थापनेनंतर पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार २००९ ला निवडून आले होते.

पक्षाला उतरती कळा लागली असली, तरी राज ठाकरेंचा करिश्मा कायम असल्याने पक्षाचा पुन्हा वटवृक्ष होईल, असा आशावाद चिखलेंना वाटतो. पक्षप्रमुखांच्या या क्रेझमुळे व त्यांचे विचार पटत असल्यानेच मनसेकडे तरुणाईचा ओढा कायम आहे, असा दावा त्यांनी केला. म्हणून तरुण मोठ्या संख्येने पक्षात येत असून त्यातून पक्ष पुन्हा उभारी घेणार आहे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. सध्याचा हा पक्षाचा सर्वात वाईट काळ (बॅडपॅच) असून त्यातून तरुणाईच्या जोरावर पुन्हा गरुडभरारी घेऊ, असे ते म्हणाले. 

आतापर्यंतच्या पालिका निवडणुकीत राज ठाकरे यांची प्रचाराची एकही सभा शहरात झाली नसून ती २०२२ ला घेण्याचे नियोजन आहे. त्यातून एकाचे पाच नाही, तर बारा नगरसेवक शहरात होतील, असा दावा त्यांनी आताच केला आहे. 


Edited By - Amol Jaybhaye 


 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in