दादा, भाऊंतील वैर संपले..फडणविसांची शिष्टाई यशस्वी

भाऊ ज्येष्ठ असल्याने दादांनी मन मोठे करीत थोडी पडती बाजू घेतल्याने हा समेट झाल्याचे समजते.
दादा, भाऊंतील वैर संपले..फडणविसांची शिष्टाई यशस्वी
लांडगे16.jpg

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे कारभारी आणि भाजपचे शहरातील आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्यातील का रे दुरावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे काल मुंबईत संपुष्टात आला. त्याला महेशदादांच्या गोटातून आज दुजोरा देण्यात आला. भाऊ ज्येष्ठ असल्याने दादांनी मन मोठे करीत थोडी पडती बाजू घेतल्याने हा समेट झाल्याचे समजते. पण, तो झाल्याला खरा दुजोरा दुपारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीतून मिळणार आहे. भाऊंच्या समर्थक सदस्यांच्या राड्याशिवाय ही बैठक पार पडली, तरच खऱ्या अर्थाने भाऊ, दादांच्या पाठिराख्यांतही ही दिलजमाई झाल्याचे स्पष्ट होणार आहे.

२०१७ ला प्रथमच पालिकेत सत्ता आल्यानंतर दादा व भाऊ गटात पदाधिकारी नियुक्त्यांवरून शीतयुद्ध सुरु झाले. नंतर त्याला मोठे गंभीर वळण मिळाले. दरम्यान, एकेकाळचा मित्र असलेला शिवसेना कट्टर विरोधक होऊन राज्यात तो सत्तेत आल्याने हा दुरावा आणखी वाढला. कारण, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने भाऊंचा कट्टर विरोधक असलेल्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्याच्या कामाला स्थायीतील दादा समर्थकांनी पाठिंबा दिल्याने हा वाद राडा होण्यापर्यंत गेल्या दोन बैठकांत पोचला. 

एकमेकांची कामे दोन्ही गटांचे पदाधिकारी अडवू लागले. दरम्यान,विरोधकांनीही भाजपच्या नव्या दोन आमदार कारभाऱ्यांनी शहर वाटून घेतल्याचा आरोप केला. त्यातून चुकीचा संदेश गेला. शहर विकासातही त्याचा अडथळा येऊ लागला. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठांना त्यात लक्ष घालणे भाग पडले. दादा हे फडणवीसांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे राज्य विधीमंडळाच्या दोन दिवसांच्या हिवाळी अधिवेशानिमित्त मुंबईत आलेल्या दादा,भाऊंना त्यांनी बोलावून घेतले. अडीच तास चर्चा करून त्यांच्यातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला.चौदा महिन्यावर आलेल्या पालिका निवडणुकीत या दुफळीचा फटका बसेल आणि राज्यात सत्तेतील राष्ट्रवादी,शिवसेना आणि कॉंग्रेस त्याचा फायदा उठवील, असे यावेळी या दोघांना सांगण्यात आल्याचे कळते. हा बाण नेमका लागला आणि वादावर पडला पडला.आपल्या पूर्वीच्या पुणे पदवीधर मतदारसंघातच नव्हे,तर नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत सपाटून मार खाल्याने धक्का बसलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनीही पिंपरी-चिंचवडचा राहिलेला गड राखण्यासाठी या मध्यस्थीत हातभार लावला.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in