ओबीसींना आरक्षणापासून वंचित ठेवणे हा भाजप-आरएसएसचा कट - Protests against Congress for OBC reservation in Pimpri Chinchwad  | Politics Marathi News - Sarkarnama

ओबीसींना आरक्षणापासून वंचित ठेवणे हा भाजप-आरएसएसचा कट

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 26 जून 2021

ओबीसीना आरक्षणापासून वंचित ठेवणे हा भाजप- आरएसएसचा पुर्वनियोजित कट आहे.  

पिंपरी : ओबीसी आरक्षणाचे मारेकरी हे कॉंग्रेसचे दोन पदाधिकारी असल्याचे सांगत त्यांची नावेही विधानसभेतील विरोधी पक्षनेते भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता.  २६) नागपूरमध्ये सांगितली. तर,ओबीसी, बहूजनांना आरक्षणापासून वंचित ठेवणे हा भाजप आणि त्यांची मातृसंस्था आरएसएसचा पुर्वनियोजित कट असल्याचा आरोप पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केला आहे. Protests against Congress for OBC reservation in Pimpri-Chinchwad  

ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात येण्यास केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत केंद्र सरकारच्या विरोधात प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने राज्यभर निदर्शने करण्यात आली. त्यानुसार पिंपरी-चिंचवडमध्येही आज निदर्शने झाली. त्यावेळी साठे म्हणाले की, सुनावणी सुरु असताना न्यायालयाने मागणी करूनही ओबीसी जनगणनेचा डाटा तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला नाही. फडणवीस हे बोलतात एक आणि करतात दुसरेच हे त्यातून सिध्द झाले. हा डाटा वेळेत सादर करणे ही फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांची नैतिक जबाबदारी होती. त्यामुळे या दोघांनी  याबाबत जाहीर माफी मागितली पाहिजे. स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी आणि माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या प्रयत्नातून मिळालेले आरक्षण हटविणे हे आरएसएसच्या मुळ अजेंड्यावर असल्याचा आरोपही त्यांनी केला.

२०११च्या जनगणनेतील ओबीसींचा आवश्यक डाटा सर्वोच्च न्यायालयात वेळेमध्ये तत्कालीन भाजपचे केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य सरकारने दिला नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसींचे राजकीय आरक्षण न्यायालयाने रद्द केले, असे साठे म्हणाले. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी छत्रपती शाहुंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते.  

माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, महिला कॉंग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, पिंपरी ब्लॉकचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशुराम गुंजाळ, युवक प्रदेश सरचिटणीस मयूर जयस्वाल, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, लक्ष्मण रुपनर, मकरध्वज यादव आदी यावेळी उपस्थित होते.

ओबीसी आरक्षणावरुन भाजप-काँग्रेस आमनेसामने 
यवतमाळ : राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी आरक्षण गेल्याचा आरोप भाजप केला आहे.  ओबीसी आरक्षण पुन्हा मिळावे, यासाठी राज्यभरात आज ठिकठिकाणी भाजपतर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. ओबीसीचे आरक्षण रद्द केल्याप्रकरणी भाजपने आक्रमक भुमिका घेतली आहे. आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करीत महाविकास आघाडी सरकारचा निषेध भाजपने केला आहे. दुसरीकडे काँग्रेसने ओबीसी आरक्षणा रद्द केल्याने केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण संपविण्यात केंद्र सरकारच कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेसने करीत यवतमाळ मध्ये तहसील चौकात आंदोलन केले. 
 Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख