आपण शेतात कोणत्या नवीन गोष्टी करता? : मोदींची मावळातील शेतकऱ्याशी ‘मन की बात’ - Prime Minister Narendra Modi interacted with farmers in Maval taluka | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

आपण शेतात कोणत्या नवीन गोष्टी करता? : मोदींची मावळातील शेतकऱ्याशी ‘मन की बात’

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 5 जून 2021

आपल्याकडे सर्वजण मिळून शेती करता का?

बेबडओहळ  (जि. पुणे) : ‘‘नमस्कार, कसं काय ठीक आहे का?’’.... ‘हो ठीक आहे’....आता पहिले हे सांगा, आपण शेतात कोणत्या नवीन गोष्टी करता, ज्या ऐकून देशातील जनतेला त्या चांगल्या वाटतील. हा संवाद आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील आढले बुद्रूक येथील शेतकरी बाळू नथू वाघमारे यांच्यामधील. (Prime Minister Narendra Modi interacted with farmers in Maval taluka)  

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधण्याची संधी बाळू वाघमारे यांना मिळाली. आंबी येथील नोबेल एक्सचेंज या जैविक खताच्या केंद्राने त्यांना ही संधी प्राप्त करून दिली. शेतीत वापरलेले नवीन तंत्रज्ञान व प्रयोगांबाबत मोदी यांनी वाघमारे यांना बोलते केले. कसं काय बरं आहे का?, अशी मराठीतून विचारणा करत त्यांनी संवादाला सुरुवात केली.

हेही वाचा : कोरोनामुळे अनाथ बनलेल्या सार्थकची यशोमती ठाकूरांनी केली विचारपूस

मोदी म्हणाले की, प्रथम आपण शेतीमध्ये करत असलेल्या नवीन गोष्टींबद्दल सांगा की जे ऐकून देशातील जनतेला चांगले वाटेल. त्यानंतर वाघमारे यांनी शेतीतील प्रयोगाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, मी शेतात तांदूळ, हरभरा, सोयाबीन, वाटाणा, भुईमूग अशी पिके घेतो, तर भाजीपाल्यांमध्ये भेंडी, मिरची, वांगी, गवार व इतर सर्व पिके घेतो. ही सर्व पिके घेत असताना मी जैविक खतांचा जास्त वापर करतो. तळेगाव या ठिकाणी याचा मोठा प्लॅन्ट आहे.

त्यानंतर मोदी यांनी तुमच्या येथे इथेनॉल आणि बायोगॅसचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे का?. आपल्याला याचा कशा प्रकारे लाभ मिळाला? आपण त्या संदर्भात कसे जोडले गेले आहात? असा दुसरा प्रश्न केला. त्यावर मी पूर्णतः जैविक खताचा वापर करतो. पण, तुम्ही तयार करता की दुसरीकडून आणता? असा प्रश्न मोदींनी पुन्हा विचारला असता, आम्हाला आमच्या येथेच जैविक खत उपलब्ध होत असल्याने आम्ही ते घेतो. याचा खर्चही कमी आहे, अशी माहिती वाघमारे यांनी दिली.

आपल्या या जैविक पिकाबद्दल परिसरातील नागरीकांना याची माहिती आहे का? यावर वाघमारे यांनी सांगितले की, हो मला आता शेतकरी विचारतात कि जैविक खत कोठे मिळते, तर मी त्यांना माहिती देतो व जैविक खतदेखील देतो.

आपल्याकडे सर्वजण मिळून शेती करता का? यावर आम्ही सगळे मिळून शेती करतो, असे उत्तर वाघमारे यांनी दिले. त्यानंतर मोदी म्हणाले की, आपल्याकडे गावांमध्ये शेतात महिलांचा खूप मोठा सहभाग असतो. मला आनंद आहे की, तुम्ही परिवारातील महिलासह या कार्यक्रमात सहभागी झाला आहात. शेवटी मोदींनी कोरोना काळात सुरक्षित राहण्याचा सल्लाही दिला.

पंतप्रधान मोदी यांच्याशी साधलेल्या संवादाबद्दल शेतकरी बाळू वाघमारे म्हणाले, खरं तर मला याची काही कल्पना नव्हती. कंपनीत गेलो असता मला मी शेतीत करत असलेल्या प्रयोगाबद्दल माहिती विचारण्यात आली. थेट देशाच्या पंतप्रधानांशी बोलण्याचा योग आला, हे माझ्या दृष्टीने अतिशय भाग्याचे आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख