नेवाळेंना अटक करणे पोलिसांनाच पडले महागात - Police will be suspended for arresting Newale | Politics Marathi News - Sarkarnama

नेवाळेंना अटक करणे पोलिसांनाच पडले महागात

उत्तम कुटे 
रविवार, 7 मार्च 2021

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (पीडीसीसी) माजी संचालक बाळासाहेब नेवाळे यांना गेल्या महिन्यात अटक करणे पुणे ग्रामीणमधील कामशेत पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे.

पिंपरी : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (पीडीसीसी) माजी संचालक बाळासाहेब नेवाळे यांना गेल्या महिन्यात अटक करणे पुणे ग्रामीणमधील कामशेत पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. कारण त्यांच्याविरुद्धच्या बनावटगिरी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्याकरिता साडेतीन लाख रुपयांची लाच घेतल्याने या पोलिस ठाण्याचे प्रमुख तथा पीआय तसेच सदर गु्न्ह्याचे तपासाधिकारी आणि एक हवालदार असे तिघे गोत्यात आले आहेत. अटकेनंतर त्यांच्या निलंबनाचीही कारवाई होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक अलका सरग यांच्यामुळे या प्रकरणातील तिन्ही आरोपी व त्यातही एपीआय पकडला गेला आहे. तिघांचा व त्यातही एपीआयचा सहभाग स्पष्ट होईपर्यंत वाट पाहून दोन दिवसांच्या पाळतीनंतर हा ट्रॅप सरग यांच्यामुळे यशस्वी झाला आहे. त्यांनी याअगोदर पिंपरी वाहतूक विभागात काम केलेले आहे. तर, लाचखोरीत पकडला गेलेला कामशेतचा हवालदार हा ही पिंपरीतच रहायला आहे. सरग यांच्यामुळेच या प्रकरणात दबाव  येऊ न देता कारवाई झाली आहे. 

गजा मारणेची अभिनव देशमुखांनी केली थेट येरवड्यात रवानगी

 

शनिवारी (ता. ६ मार्च) दुपारी झालेल्या या लाचेच्या सापळा कारवाईप्रकरणी उशीरा म्हणजे आज सकाळी लाचखोरीचा नोंद  झालेला हा गुन्हा त्याला दुजोरा देत आहे. त्यात नेवाळेंविरुद्धच्या गुन्ह्याचा तपास करणारे कामशेत टाकवे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक तथा एपीआय प्रफुल्ल प्रभाकर कदम (वय३३, रा. वडगाव मावळ), या पोलिस ठाण्याचे प्रमुख असलेले पोलिस निरीक्षक (पीआय) अरविंद दौलत चौधरी (वय ५०,रा. कान्हेफाटा, मावळ)आणि हवालदार महेश विनायक दौंडकर (वय ३९ रा. पिंपरी) हे आरोपी आहेत.

गेल्या महिन्यात २० तारखेला फसवणुकीचा गुन्हा नोंदवून लगेच दुसऱ्या दिवशी नेवाळेंना कामशेत पोलिसांनी अटक केली होती. त्यांची जामीनावर सुटका व्हावी, यासाठी नेवाळे यांचे भाचे व पंचायत समिती सदस्य दत्तात्रेय शेवाळे यांच्याकडून २३ फेब्रुवारीला अडीच लाख रुपये पीआय राहत असलेल्या बिल्डींगच्या खाली घेण्यात आले. पण, तेथे जामीन मिळालाच नाही. नंतर सत्र न्यायालयात जामीन मिळवून देण्यासाठी दौंडकर हा ४ मार्चला शेवाळे यांना पुन्हा भेटला. त्याने त्यासाठी आणखी दोन लाख रुपये देण्याची मागणी केली. त्याबाबत दुसऱ्या दिवशी शेवाळेंनी एसीबीत तक्रार दिली. 

नाशिक येथे होणारे अखिल भारतीय साहित्य संमेलन स्थगित; कोरोनामुळे घेतला निर्णय
 

दरम्यान, दौंडकरने ६ तारखेला शेवाळेंना पोलिस ठाण्यावर बोलावले. तेथे त्याने व चौधरीने दोन लाख रुपये मागितले. मात्र, तेवढे नाही, असे सांगत एक लाख देऊ असे ते म्हणाले. त्यावर ठीक आहे, असे म्हणत एक लाख नंतर द्या, असे चौधरी म्हणाले. एका तासात देतो, असे सांगून शेवाळे बाहेर पडले. मात्र, एपीआय कदमचा सहभाग स्पष्ट होण्यासाठी ते पुन्हा पोलिस स्टेशनवर गेले. कदम आणि दौंडकरला भेटले. त्यावेळी कदम यांच्या केबिनमध्ये आलेल्या चौधरींनी माझे बोलणे झाले असून जामीन मिळवून द्या, असे कदमांना सांगितले. त्यावर एक लाख द्या व जामीन झाल्यावर कदमसाहेबांना स्वखुशीने येऊन भेटा, असे शेवाळेंना सांगण्यास दौंडकर विसरला नाही. 

दुपारी शेवाळेंच्या कार्यालयाजवळ पांढऱ्या मोटारीत लाच घेताना दौंडकर पकडला गेला. अशारितीने आपणच खोदलेल्या खड्यात कामशेत पोलिस पडले. या घटनेनंतर नेवाळे व पोलिसांच्या या परस्पर कुरघोडीची चर्चा आज मावळात रंगली आहे. नेवाळेंविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यात त्यांना अटक करणे पोलिसांनाच महागात पडल्याचीही चर्चा ऐकायला मिळाली.

Edited By - Amol Jaybhaye

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख