हफ्तेखोरीची चटक लागलेल्या PSIला कृष्णप्रकाश कायमचे घरी पाठवणार 

गेल्या पंधरा दिवसातील पिंपरी-पोलिस दलातील निलंबनाची ही दुसरी घटना आहे.
 Pimpri-Chinchwad Police Commissioner Krishnaprakash suspended PSI  .jpg
Pimpri-Chinchwad Police Commissioner Krishnaprakash suspended PSI .jpg

पिंपरी : पिंपरीतील एका पीएसआयने आजारपणाच्या रजेवर असताना गणवेशात जाऊन पुण्यात पबचालकाकडून खंडणी वसुली केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. त्याबाबत त्याला काल (ता. २५) अटक केली असून उद्यापर्यंत (ता. २६) पोलिस कोठडीही मिळाली आहे. दरम्यान, याची तातडीने दखल घेत पिंपरी-चिंचवडचे (Pimpri-Chinchwad) पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (Krishnaprakash) यांनी त्याला तडकाफडकी कालच निलंबित केले. आता बडतर्फीचीही कारवाई सुरु झाल्याने त्याला आता कायम घरी बसण्याची वेळ आली आहे. उमेदीच्या काळात अत्यंत हुशार म्हणून कामगिरी केलेल्या या अधिकाऱ्याला नंतर लाच व हफ्तेखोरीची चटक लागल्याने वाया गेला. (Pimpri-Chinchwad Police Commissioner Krishnaprakash suspended PSI) 

रजाकाळात वर्दीत जाऊन पबसह इतर दोन हॉटेलचालकांना कमिशनर ऑफिसमधून आलोय, असे सांगत धमकावून हफ्ता मागणाऱ्या या पीएसआयचा व्हिडिओ 'सरकारनामा'च्या हाती आला आहे. त्यात तो आजारी असल्याचे अजिबात वाटत नसून गणवेशात जणू काही ड्यूटीवर आहे, असे तो भासवत आहे. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात कामाला असूनही पुणे पोलिस आयुक्तालय हद्दीत जाऊन तेथील हॉटेलचालकांकडे खंडणी मागण्याचे धाडस त्याने केले. एवढेच नाही, तर त्यासाठी पुण्यातच जणू ड्यूटीला असल्याचे भासवले. वर, पोलिस आयुक्त कार्यालयातून आल्याचे सांगत त्याने आयुक्तांच्या प्रतिमेवरही शंका निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

गेल्या पंधरा दिवसातील पिंपरी-पोलिस दलातील निलंबनाची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी गुन्हे शाखेतील पोलिस शिपाई लक्ष्मण नावजी आडारी याला गुन्हेगाराला मदत केली म्हणून याच महिन्यात १२ तारखेला कृष्णप्रकाश यांनी निलंबित करून घरी बसवले. तर अधिकाऱ्याविरद्ध गुन्हा दाखल होताच लगेचच त्याच्याविरुद्धही असाच कारवाईचा बडगा आयुक्तांनी काल उगारला. पोलिस खात्याची प्रतिमा मलीन करून अधिकाऱ्याला न शोभेल असे कृत्य केल्याने आयुक्तांनी या पीएसआयला सेवेतून बडतर्फच करण्याची कार्यवाही आता सुरु केली आहे. दरम्यान, वर्दीशी असे अशोभनीय कृत्य कराल, तर गय केली जाणार नाही, असा इशारा या घटनेनंतर त्यांनी आपल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिला आहे. चुकीला माफी नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे.  

मिलन शंतून कुरकुटे (वय ३२, रा. कुरकुटे निवास, कासारवाडी, भोसरी, पिंपरी-चिंचवड) असे या खंडणीखोर फौजदाराचे नाव आहे. त्याला उद्यापर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश काल न्यायालयाने दिला असल्याचे तपासाधिकारी एच. एस. गिरी यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. गेल्यावर्षी तो लाच घेतानाही पकडला गेला होता. त्यातही त्याला निलंबित करण्यात आले होते. नंतरपुन्हा सेवेत आल्यानंतर त्याला नियंत्रण कक्षात काम देण्यात आले होते. आजारी असल्याचे सांगून त्याने २१ तारखेपासून रजा घेतली होती. 

रजेवर असतानाच तो २४ ऑगस्टला गणवेषात पुण्यात कार्निवल या पबमध्ये गेला. कमिशनर ऑफिसमधून आल्याचे सांगून त्याने तेथे आरडाओरडा केला. धमकावत त्याने सात हजाराची खंडणी घेतली होती. त्याबद्दल सदर हॉटेल व्यवस्थापकाच्या फिर्यादीवरून मुंढवा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खंडणी व धमकावल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मुंढव्यातील आणखी दोन हॉटेलात जाऊन अशाचप्रकारे हफ्ते घेतले होते, असेही समोर आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com