शिवसेनेचा अस्तित्वासाठी आटापिटा : भाजपचा पलटवार  - pipmri Shiv Sena's struggle for existence : BJP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : लॉकडाऊनच्या विरोधात साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पोवईनाका येथे पोत्यावर बसून भिक मांगो आंदोलन केले.

शिवसेनेचा अस्तित्वासाठी आटापिटा : भाजपचा पलटवार 

उत्तम कुटे
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

चाबूकस्वार आमदार होते, तोपर्यंत स्मार्ट सिटी चांगली होती. आताच त्यात गैरव्यवहार झाला काय?

पिंपरी : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या कामात गैरव्यवहार झाला असेल, तर चौकशीच काय, कारवाईसुद्धा करा, असे उलट आव्हान शहर भाजपने शिवसेनेला आज (ता. 26 नोव्हेंबर) दिले. महापालिका निवडणूक जवळ आल्याने अस्तित्वासाठी शिवसेनेचा हा आटापिटा चालला असल्याचा पलटवार भाजपने केला आहे. 

शिवसेना, भाजपमधील राज्य पातळीवरील दुरावा यानिमित्त महापालिका स्तरावर आला आहे. पालिका निवडणूक वर्षभरावर आल्याने तो आणखी वाढणार असून पूर्वीच्या या मित्रांमध्ये कलगीतुरा चांगलाच रंगण्याचे संकेतही मिळत आहेत. 

पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपने स्मार्ट सिटीच्या 520 कोटी रुपयांच्या एका कामात अंदाजे तीनशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर यांनी परवा केला होता. त्यावेळी पक्षाचे शहरातील माजी आमदार ऍड गौतम चाबूकस्वार व इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनीही स्मार्ट सिटीच्या टेंडर प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. राज्यात सत्ता असताना भाजपने सत्तेचा गैरवापर करून पिंपरीतील स्मार्ट सिटीचे उपकंत्राट भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या कंपनीला दिल्याचा दावाही त्यांनी केला. त्यामुळे त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. 

दरम्यान, भाजप नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदार संघातील पक्षाचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी काल शहरात होते. त्यामुळे त्या गडबडीत या आरोपाला भाजपकडून काल उत्तर आले नव्हते. ते महापालिकेतील नेते नामदेव ढाके यांनी आज दिले. 

ते म्हणाले, शिवसेना राज्यात सत्तेत आहे. त्यामुळे या आरोपाची त्यांनी खुशाल चौकशी करावी. एवढेच नाही, तर कारवाईही करावी. जर, गैरव्यवहार झाला होता, तर गेली वर्षभर सत्तेत असूनही त्यांनी कारवाई का केली नाही? चाबूकस्वार आमदार होते, तोपर्यंत स्मार्ट सिटी चांगली होती. आताच त्यात गैरव्यवहार झाला काय? पालिका निवडणूक जवळ आल्याने अस्तित्वासाठी शिवसेनेचा हा आटापिटा चालला आहे. बाकी काही नाही, असा चिमटाही त्यांनी शिवसेनेला घेतला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख