पिंपरीत महाघोटाळा ! व्यापाऱ्यांच्या सेवाविकास बॅंकेत ५१५ कोटींचा गैरव्यवहार

मुलचंदानी व साथीदारांविरद्ध कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचे इतर दहा गुन्हे यापूर्वीच नोंदलेले आहेत.
पिंपरीत महाघोटाळा ! व्यापाऱ्यांच्या सेवाविकास बॅंकेत ५१५ कोटींचा गैरव्यवहार
Crime.jpg

पिंपरीः पिंपरीतील व्यापाऱ्यांची बॅंक असलेल्या दी सेवाविकास को ऑपरेटीव्ह बॅंकेत बनावटगिरी करून व्याजासह ५१५ कोटी रुपयांचा घोटाळा तथा अपहार आणि सभासदांची फसवणूक केल्याबद्दल बॅंकेचे माजी अध्यक्ष,माजी संचालक मंडळ,अधिकारी व कर्जदारांविरुद्ध पोलिसांनी गुरुवारी (ता.१२) गुन्हा दाखल केला.यामुळे इतर गैरव्यवहाराच्या एका गुन्ह्यात नुकतेच जामीन मिळालेले माजी अध्यक्ष अमर साधूराम मुलचंदानी यांच्या अडचणी पु्न्हा वाढल्या आहेत. (Pimpri scam! Misappropriation of Rs 515 crore in Merchants' Service Development Bank)

मुलचंदानी व साथीदारांविरद्ध कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचे इतर दहा गुन्हे यापूर्वीच नोंदलेले आहेत. त्यामुळे या टोळीला मोका लावणार का असे विचारले असता व्हाइट क्राइम असलेल्या या गुन्ह्यात हिंसा नसल्याने मोका वा एमपीडीएनुसार कारवाई करता येत नसल्याचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सांगितले. बेहिशोबी पैसा व्यवहारात आणण्यासाठी व व्यवहाराबाहेर काढण्याकरिता या आऱोपींनी संगनमत करून हा गुन्हा केला असल्याचे ते म्हणाले.

सहकार विभागाचे सहनिबंधक (सहकारी संस्था) राजेश उद्धवराव जाधवर (वय ५०, रा. हडपसर,पुणे) यांच्या लेखापरिक्षणातून हा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. त्यांनीच दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.१२ ऑगस्ट २०११ ते १२ ऑगस्ट २०१८ दरम्यान हा गुन्हा घडला आहे.मनमानीपणे, पुरेशा व योग्य कागदपत्रांशिवाय तारण न घेता कर्जेवाटप झाल्याने बॅंक सभासदांची फसवणूक झाल्याचे सहनिबंधकांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा..

व्याजासह एकूण ५७२ कोटी ९४ लाख रुपयांचा गैरव्यवहार तथा अपहार होऊन सभासदांची फसवणूक झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ज्या कारणासाठी कर्जे दिली,त्यासाठी ती वापरलीच गेली नसल्याचे निष्पन्न झाले आहे. वानगीदाखल शाळा नुतनीकरणासाठी घेण्यास आलेले कर्ज त्यासाठी वापरलेच गेले नसल्याचे आढळून आले आहे. पन्नास लाखांवरील १२४ कर्जे प्रकरणातच त्यांना हा एवढा मोठा गैरव्यवहार आढळला.म्हणजे पन्नास लाखाच्या आतील कर्ज प्रकरणातही अशी फसवणूक व अपहार अफरातफर झाली असून गैरव्यवहाराचा हा आकडा त्यामुळे आणखी वाढण्याची शक्यता आहे.सागर सुर्यवंशी, शीतल सुर्यवंशी, विवेक अऱ्हाना,विनय अर्हाना, धर्मेंद्र सोनकर,  सोनकर समूहासह इतर ३७ कर्जदार समूहांनाही बॅंकेचे संचालक मंडळ व  मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), सह आणि अतिरिक्त सीईओंसारख्या उच्चपदस्थ बॅंक अधिकाऱ्यांच्या जोडीने या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in