लॉकडाऊनमध्ये हॉटेल चालू ठेवलेच पण हुक्का पार्लरचीही ऐष : मग पोलिसांनी घेतला हा निर्णय!

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) करण्यात आलेल्या दुसऱ्या लॉकडाऊनला न जुमानता हॉटेल सुरुच ठेवले. एव्हढेच नाही, तर तेथे हुक्का पिण्याचीही सोय करणे हिंजवडीतील रुड लाऊंज या हॉटेलच्या चालकाला महागात पडले.
Pimpri 1
Pimpri 1

पिंपरी : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) करण्यात आलेल्या दुसऱ्या लॉकडाऊनला न जुमानता हॉटेल सुरुच ठेवले. एव्हढेच  नाही, तर तेथे हुक्का पिण्याचीही सोय करणे हिंजवडीतील रुड लाऊंज या हॉटेलच्या चालकाला महागात पडले. हिंजवडी पोलिसांनी हे हॉटेल महसूल विभागाच्या मदतीने दंड अशी सौम्य कारवाई न करता थेट सीलबंदच केले.

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या झिरो टॉलरन्स मोहिमेअंतर्गत हा दणका देण्यात आला. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे पोलिसांच्या या कठोर कारवाईला महसूल विभागानेही लाल फितीचा बावटा न दाखवता तत्पर प्रतिसाद देत हॉटेल सील करण्याचा प्रस्ताव काही तासांत मंजूर केला. त्यामुळे काल एका दिवसात धाडीची कारवाई करून पोलिसांनी चार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. नंतर सबंधित हॉटेल सीलबंद करण्याचा प्रस्ताव तालुका कार्यकारी दंडाधिकारी तथा मुळशीच्या तहसीलदारांना दिला.त्यांनीही शासकीय पद्धतीने कारभार न करता तत्पर कारवाई केली. हिंजवडी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचेही सहकार्य त्यासाठी लाभले.

आयटी उद्योग असलेल्या हिंजवडीतील (ता. मुळशी, जि.पुणे) काही हॉटेलात अनेक गैरप्रकार सुरु आहेत. वेश्याव्यवसाय सुरु असणारे असेच एक हॉटेल डिसेंबर महिन्यात आयुक्तांच्या दणक्याने हिंजवडी पोलिसांनी कायमचे सील केले आहे. त्यानंतर सीलबंदची ही दुसरी कारवाई काल त्यांनी केली. रुड लाऊंज महिनाअखेरपर्यंत म्हणजे १५ दिवसांसाठी सील करण्यात आले आहे. राज्य सरकारने नुकत्याच लागू केलेल्या कडक निर्बंधाअंतर्गत हॉटेलांना फक्त पार्सल सेवा सुरु करण्यास परवानगी  दिली गेली आहे. त्याचे स्पष्ट उल्लंघन रुड लाऊंजने केले. एवढेच नाही, तर त्याच्या मालकाने आपल्या या हॉटेलात फ्लेवर्ड हुक्का पिण्याचीही सोय केली होती.

यासंदर्भात माहिती मिळताच हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, तपास पथकाचे (डीबी) सहाय्यक निरीक्षक सागर काटे व पथकाने रुड लाउंजवर धाड टाकून रुड अर्थात कठोर कारवाई केली. साथरोग कायदा,राष्ट्रीय आपत्ती कायदा,कोविड कायदा आणि सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायद्यानुसार गुन्हा नोंदवला.लगेच सदर हॉटेस सील करण्याचा प्रस्ताव पाठवला. त्याचा लगेच पाठपुरावा करीत तो मान्यही करून आणला व हॉटेल सीलही केले. चोवीस तासांत ही विक्रमी कारवाई त्यांनी केली. त्यामुळे हिंजवडी पोलिसांचे सध्या कौतुक होत आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com