पिंपरीचे पोलिस आयुक्त बिष्णोईंची बदलीविरोधात 'कॅट'मध्ये धाव 

पिंपरी आयुक्तालयातील नियुक्तीस एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच बदली करण्यात आल्याचे आयुक्त बिष्णोई यांनी "कॅट'कडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
पिंपरीचे पोलिस आयुक्त बिष्णोईंची बदलीविरोधात 'कॅट'मध्ये धाव 
Pimpri Police Commissioner Sandeep Bishnoi's run against the transfer in 'CAT'

पुणे : पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी आपल्या बदलीविरोधात "कॅट'मध्ये धाव घेतली आहे. पिंपरी आयुक्तालयातील नियुक्तीस एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच बदली करण्यात आल्याचे आयुक्त बिष्णोई यांनी "कॅट'कडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

दरम्यान, आयपीएस अधिकारी हे शक्‍यतो बदलीविरोधात दाद मागत नाहीत. मात्र, बिष्णोई यांनी हा मार्ग अवलंबल्याने त्याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

राज्याच्या पोलिस दलातील बहुचर्चित बदल्या राज्य सरकारने 2 सप्टेंबर रोजी केल्या आहेत. यामध्ये 45 पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यात पोलिस महासंचालक (सामान्य) कार्यालयातून कृष्ण प्रकाश यांची पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. विद्यमान आयुक्त संदीप बिष्णोई यांना मात्र प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आलेले आहे. 

राज्याच्या राजकीय घडामोडीचे केंद्र, वाढती गुन्हेगारी आणि पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव येथील औद्योगिक वसाहत याचा पुण्याच्या पोलिस आयुक्त कार्यालयावर प्रचंड ताण पडत होता. पुणे पोलिस आयुक्तालयावरील कामाचा हा ताण कमी करण्यासाठी 2018 मध्ये पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालय निर्माण करण्यात आले आहे. या आयुक्तालयाच्या अंतर्गत पिंपरी, चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील काही पोलिस ठाण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. 

दरम्यान, पिंपरी चिंचवडचे पहिले पोलिस आयुक्त म्हणून आर. के. पद्मनाभन यांची नियुक्ती करण्यात आली होती. नव्याने अस्तित्वात आलेल्या या आयुक्तलयाच्या कारभाराची घडी बसविण्याचा यशस्वी प्रयत्न पद्मनाभन यांनी पहिल्याच वर्षी केला होता. पण, 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आर. के. पद्मनाभन यांची बदली करण्यात आली होती आणि त्यांच्या जागी 29 नोव्हेंबर 2019 रोजी संदीप बिष्णोई यांना आणण्यात आले होते. 

पिंपरी चिंचवड आयुक्त कार्यालयातील नियुक्तीस एक वर्ष पूर्ण होण्याआधीच बिष्णोई यांची बदली करण्यात आली आहे. हाच मुद्दा घेऊन बिष्णोई यांनी "कॅट'मध्ये धाव घेतली आहे. त्यांनी राज्याचे गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तपदी नियुक्तीचे आदेश मिळालेले कृष्ण प्रकाश, केंद्रीय गृह सचिवालय यांना प्रतिवादी केले आहे. 

या वादावर "कॅट'मध्ये कोणता निर्णय होणार, याकडे पिंपरी चिंचवडचे लक्ष लागून राहिले आहे. संदीप बिष्णोई हेच आयुक्त म्हणून कायम राहणार की कृष्ण प्रकाश हे पद्‌भार स्वीकारणार, याची पिंपरी चिंचवडसह पुणे शहरातही उत्सुकता आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in