कृष्णप्रकाश बनले मियॉं, तर प्रेरणा कट्टे बिवी; मध्यरात्री पोलिस स्टेशनची घेतली झाडाझडती

आयुक्तांच्या या वेषांतरातील पाहणीमुळे शहर पोलिस दलाने व त्यातही ठाणे अंमलदार म्हणून काम करणाऱ्या हवालदारांनी चांगलाच धसका घेतला आहे.
कृष्णप्रकाश बनले मियॉं, तर प्रेरणा कट्टे बिवी; मध्यरात्री पोलिस स्टेशनची घेतली झाडाझडती
Krishnaprakash .jpg

पिंपरी : कोरोना काळात त्रस्त जनतेशी पोलिस कसे वागतात. दिलासा देतात की तेथेही त्यांच्या त्रासात भरच पडते, याचा प्रत्यक्ष अनुभव पिंपरी-चिंचवडचे (Pimpri-Chinchwad) पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (Krishnaprakash) यांनी स्वत वेषांतर करून बुधवारी (ता. ५) मध्यरात्रीनंतर घेतला. त्यांच्या या परिक्षेत दोन पोलिस ठाणी पास, तर एक नापास झाले. त्यामुळे चांगला अनुभव सर्वसामान्य जनतेला दिलेल्या ठाण्यांतील अंमलदारांना ते प्रमाणपत्रासह बक्षिसी, तर फेल असलेल्या पोलिस ठाण्यातील ड्यूटी ऑफिसरला ते मेमो देणार आहेत. (Pimpri Police Commissioner Krishnaprakash disguised himself and inspected the police station)

दरम्यान, आयुक्तांच्या या वेषांतरातील पाहणीमुळे शहर पोलिस दलाने व त्यातही ठाणे अंमलदार म्हणून काम करणाऱ्या हवालदारांनी चांगलाच धसका घेतला आहे. त्यामुळे आयएसओ मानांकन मिळालेल्या शहरातील पोलिस ठाण्यांवर आता तशीच वागणूक मिळेल, अशी आशा करायला हरकत नाही. तसेच पुन्हा असे वेषांतर करणार असल्याचे सांगितल्याने शहर पोलिसांची जनतेप्रतीची वागणूक आता आणखी सुधारेल, यात शंका नाही.

दोन तासांच्या या पाहणी दौऱ्यांत आयुक्तांनी पिंपरी, वाकड आणि हिंजवडी या पोलिस ठाण्यांना जमालखान कमालखान पठाण बनून भेट दिली. त्यात पिंपरी अनुत्तीर्ण, तर बाकीची दोन्ही ठाणी उत्तीर्ण झाली. इतर वेषांतर केले असते, तर मला लगेच ओळखण्यात आले असते. म्हणून मुस्लिम बनून गेलो आणि ही योजना यशस्वी ठरली, असे कृष्णप्रकाशांनी 'सरकारनामा'ला सांगितले. झिरो टॉलरन्स या आपल्या मोहिमेअंतर्गत भविष्यातही आपण वेषांतर करून धाडी टाकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सीपी हे मियॉं, तर एसीपी (सहाय्यक पोलिस आयुक्त, चाकण विभाग) प्रेरणा कट्टे (Prerna Katte) या त्यांच्या बुरख्यातील बिवी बनून गेल्या होत्या. दोन तासांच्या या पाहणी दौऱ्यांत आयुक्तांनी पिंपरी, वाकड आणि हिंजवडी या पोलिस ठाण्यांना भेट दिली. टॅक्सी करून हे जोडपे मध्यरात्री सव्वाबारा वाजता पिंपरी पोलिस ठाण्यात गेले. शेजाऱ्याला कोविडसाठी रुग्णवाहिका पाहिजे. पण, त्यासाठी आठ हजार रुपये मागितले आहेत. तुम्ही तक्रार घ्या असे सांगत त्यांनी रुग्णवाहिकेचा नंबर अंमलदाराकडे दिला. मात्र, हे आमचे काम नाही, असे सांगत त्यांना तेथून पिटाळण्यात आले.

त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा रात्री दीडला हिंजवडी पोलिस ठाण्याकडे वळवला. तेथे आपल्या पत्नीची सोन्याची चेन हिसकावल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया लगेच सुरु झाली. त्यानंतर दोन वाजता ते वाकड पोलिस चौकीवर गेले. आमच्या रमजानच्या उपवासात परिसरात रोज फटाके वाजवतात, त्याचा त्रास होतो. त्याचा जाब विचारला, तर ते वाजवणाऱ्यांनी माझ्या बायकोची छेड काढली, मला मारहाण केली,असे जमालखान बनलेल्या आयुक्तांनी तेथे सांगितले. त्यावर अंमलदाराने ही तक्रार, तर नोंदवून घेतलीच, शिवाय प्रकार गंभीर असल्याने वरिष्ठांना बोलावतो असे सांगून तोपर्यंत थांबण्याची विनंती केली.

दरम्यान, पिंपरी पोलिसांकडे आयुक्तांनी तक्रार केलेल्या रुग्णवाहिकाचालकाविरुद्ध खरोखरच त्यांच्याकडे तक्रार आलेली होती. पण, त्यामुळे काल (ता. ६) त्यांनी गुन्हे शाखेच्या पोलिसांमार्फत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या सदर रुग्णवाहिकाचालकावर कारवाई करून त्याला धडा शिकवला, तसाच तो आपल्या पोलिस दलालाही दिला. 

Edited By - Amol Jaybhaye

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in