पिंपरी पालिकेने पाळला सरकारचा आदेश, तृतीयपंथीय समुदायाचेही केले लसीकरण

कोविड लसीकरणाचे महत्व पालिकेच्या वैद्यकीय अधिका-यांनी समजावून सांगितल्याने आम्ही लसीकरण करुन घेतले असून, कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी इतरांनीही लसीकरण करुन घ्यावे.
पिंपरी पालिकेने पाळला सरकारचा आदेश, तृतीयपंथीय समुदायाचेही केले लसीकरण
Pimpari.jpg

पिंपरीः आम्ही पण समाजाचा घटक आहोत. आम्हाला, पण समाजात चांगले जगण्याचा हक्क आहे. तो हक्क पिंपरी चिंचवड (Pimpri Chincwad) महापालिकेने आमच्या कोरोना लसीकरणासाठी पुढाकार घेवून आम्हाला दिला. त्याबद्दल आम्ही अतिशय आनंदित आहोत, अशी भावना तृतीयपंथी दलजीतसिंग यांनी शुक्रवारी (ता. ९) पिंपरीत  व्यक्त केली. (Pimpri Municipality complied with the government's order and vaccinated the third party community)

कोविड लसीकरणाचे महत्व पालिकेच्या वैद्यकीय अधिका-यांनी समजावून सांगितल्याने आम्ही लसीकरण करुन घेतले असून, कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी इतरांनीही लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

पालिकेच्या वतीने ट्रान्सजेंडर घटकासाठी विशेष कोविड लसीकरण मोहिम घेण्यात आली. त्यासाठी पिंपरी येथील पालिकेच्या जिजामाता रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. ट्रान्सजेंडर समुहाने स्वयंप्रेरणेने या लसीकरणात सहभाग घेतला.

पालिकेने दिलेल्या आदराच्या वागणुकीमुळे समाधान देखील त्यांनी व्यक्त केले. अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संगिता तिरुमणी, डॉ. करुणा साबळे यांच्या उपस्थितीत ही मोहीम पार पडली. तृतीयपंथी समूदायाचे कोरोना लसीकरण करावे, असा शासकीय आदेश असल्याने त्याची अंमलबजावणी केली, असे डॉ. डांगे यांनी `सरकारनामा`ला सांगितले. ४९ तृतीयपंथीयांचे लसीकरण करण्यात आले असून, उद्याही ते सुरु राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी कोविड लसीकरण प्रभावी असल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी पटवून दिल्याने आम्ही सहका-यांसह या लसीकरण मोहिमेत सहभाग घेण्याचा निर्णय घेतल्याचे दलजीतसिंग यांनी सांगितले.  

आम्ही दुकान मागायला जातो, त्यावेळी व्यक्तींशी संपर्क येणे साहजिक आहे. अशावेळी कोरोना संसर्गाचा धोका अधिक असतो. आम्ही आता लसीकरण केल्याने आमच्यामध्ये कोरोनापासून सुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे. इतरांनी देखील लसीकरणाचे महत्व ओळखून लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन दलजीतसिंग यांनी केले.

पालिकेने आम्हाला चांगली वागणूक देऊन आमच्या उत्तम आरोग्याचा विचार करुन हा मोहिम राबविल्याबद्दल ट्रान्सजेंडर प्रतिनिधी किरण हुबळीकर, पुजा आंभोरे, पंकज बोकील, विश्वनाथ जैस्वाल आदींनी पालिका प्रशासनाचे आभार मानले.
 

हेही वाचा..

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in