लेकीच्या मांडव टहाळीला भाजप आमदाराचा डान्स, नागरिक म्हणतात कारवाई होणार का?

विवाह सोहळ्यापूर्वी आयोजित कार्यक्रमात लांडगेंनी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत नृत्य केले.
लेकीच्या मांडव टहाळीला भाजप आमदाराचा डान्स, नागरिक म्हणतात कारवाई होणार का?
Pimpri MLA Mahesh Landage's dance at the girl's wedding .jpg

पिंपरी : भोसरी मतदारसंघाचे भाजपचे (BJP) आमदार आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहराध्यक्ष महेश लांडगे (Mla Mahesh landge ) यांचा बेफाम नाचतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. कन्या साक्षी लांडगे यांच्या विवाह सोहळ्यापूर्वी आयोजित कार्यक्रमात लांडगेंनी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत नृत्य केले. मात्र, यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न केल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. (Pimpri MLA Mahesh Landage's dance at the girl's wedding)

लांडगे यांच्या मुलीचे लग्न आहे. या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. लग्नातील मांडवटाळ हा कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यावेळी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत आमदार महेश लांडगे बेफाम होऊन नृत्य करताना दिसले. समर्थकांच्या खांद्यावर बसून लांडगेंनी नृत्याचा आनंद लुटला. मात्र, कार्यक्रमात आमदारांनी भंडारा उधळत कोरोनासंबंधी सर्व नियम पायदळी तुडवले. या कार्यक्रमात काही अपवाद वगळता आमदारांसह अनेक जण विनामास्क वावरत असताना व्हिडिओत दिसत आहेत. 

कोरोनामुळे सध्या राज्यभरात लॅाकडाऊन आहे. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी आहे. लग्न समारंभासाठी फक्त 25 जणांना परवानगी आहे. मात्र, या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. त्याच बरोबर मास्क, सोशल डिस्टन्सिंग हे कोरोना बाबतचे सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले. त्यामुळे भोसरी पोलिस आणि महापालिका आरोग्य विभाग आमदारावर कारवाई करणार का? असा प्रश्न पिंपरी-चिंचवड मधिल नागरिकांना पडला आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित करत कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असली तरी अद्याप काळजी घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत अद्याप ही संख्या खाली आलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दहावीची परीक्षा न घेण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे स्पष्ट करत बारावीसाठी काय धोरण ठरवायचे, हे लवकरच जाहीर करू, असे ठाकरे यांनी जाहीर केले. तसेच लाॅकडाऊन लगेच शिथिल होणार नाही, हे देखील त्यांनी ठामपणे सांगितले. तो पंधरा दिवसांनी वाढविणार असल्याची त्यांनी घोषणा केली. 

शहरातील वाढ थांबली आहे. कोरोनामुक्त गाव, असा निर्धार करायला हवा. माझे घर कोरोनामुक्त राहिले तर माझी वस्ती कोरोनामुक्त राहिल आणि त्यातून माझे गाव कोरोनामुक्त आपोआप होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
 


 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in