रेमडेसिव्हिरच्या काळ्याबाजारप्रकरणी नगरसेविकेच्या मुलाला अटक

त्यांना पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने परवा सापळा लावून पकडले.
रेमडेसिव्हिरच्या काळ्याबाजारप्रकरणी नगरसेविकेच्या मुलाला अटक
Pimpri corporator's son arrested in black market case of Remdesivir injection

पिंपरी  ः पिंपरी-चिंचवडमधील अपक्ष नगरसेविका साधना अंकुश मळेकर यांचा मुलगा वैभव मळेकर याच्यासह त्याच्या मित्राला पुणे पोलिसांनी रेमडेसिव्हिरचा काळाबाजार करीत असल्याच्या आरोपावरून नुकतीच (ता.२४) अटक केली. त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या दोघांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

शुभम नवनाथ आरवडे (वय २२, रा. चिंचवड) असे दुसऱ्या संशयिताचे नाव आहे.  दोघांकडून दोन रेमडेसिव्हिर इंजेक्शन, एक मोबाईल आणि २२ डमी नोटा असा ऐवज जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. खडकीतील रुग्णालयाबाहेर ते विनापरवाना, विनाप्रिस्क्रीप्शन, विना कोरोना पॉझीटीव्ह प्रमाणपत्र रेमडेसिव्हिरसह मिळून आल्याने बेकायदेशीरपणे हे औषध जवळ बाळगल्याबद्दल त्यांना पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने परवा सापळा लावून पकडले. च्याविरुद्ध भारतीय दंड संहितेतील फसवणुकीसह औषध किंमत नियंत्रण कायदा, वनावश्यक वस्तू कायदा आणि औषधे व सौंदर्य प्रसाधन कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शुभम आणि वैभव हे लहानपणापासूनचे मित्र आहेत. दोघेही सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. शुभमच्या नातेवाईकाला कोरोना झाल्याने त्याच्यासाठी रेमडेसिव्हिर  घेण्याकरिता वैभव गेला होता, असे त्याच्या आई असलेल्या नगरसेविका साधना मळेकर यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले. असे समाजकार्य नगरसेवकाने करायचे नाही का, एखाद्याचा जीव जात असेल, तर शांत बसायचे का, असा सवाल त्यांनी केला. माझ्या मुलाला कसलीही ददात नसून तो काही शेकडो रुपयांसाठी हे कृत्य करील का अशी विचारणा त्यांनी केली. शुभमला हे औषध घेऊन देण्यास वैभवने फक्त मदत केली. एवढीच त्याची भूमिका आहे. तसेच, इंजेक्शन त्याच्याजवळही मिळालेले नाही, असे त्या म्हणाल्या. 

दरम्यान, ‘‘रुग्णालयाबाहेर हे दोघे मिळून आल्याने संशयाला जागा आहे,’’ असे तपास अधिकारी झंझाड यांनी सांगितले.

दरम्यान, या कारवाईतून गरजू रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय वा कोरोना पॉझिटीव्ह प्रमाणपत्राशिवाय हे रेमडेसिव्हिर खरेदी करण्याचा व त्यातही काळाबाजारातून ते विकत घेण्याचा प्रयत्न केल्यास ते कसे अंगलट येते, हा संदेश गेला आहे. तसेच, ते विना परवाना वा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवायही जवळ ठेवले, तरी काळाबाजार करण्याच्या उद्देशातून ते बाळगले म्हणून गुन्हा दाखल होऊ शकतो.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in