पिंपरीत नगरसेवक 128; पाणी पुरवठ्याच्या बैठकीस आठच हजर 

वना (ता. मावळ, जि. पुणे) धरण शंभर टक्के भरलेले असतानाही पिंपरी चिंचवड शहरात अजूनही दिवसाआड आणि अशुद्ध पाणी येते.
पिंपरीत नगरसेवक 128; पाणी पुरवठ्याच्या बैठकीस आठच हजर 
Pimpri Corporator 128; Only eight attended the water supply meeting

पिंपरी : सुरळीत आणि शुद्ध पाणीपुरवठ्याच्या प्रश्‍नावर बोलविण्यात आलेल्या  बैठकीकडे सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पाठ फिरविली. 

पवना (ता. मावळ, जि. पुणे) धरण शंभर टक्के भरलेले असतानाही पिंपरी चिंचवड शहरात अजूनही दिवसाआड आणि अशुद्ध पाणी येते. हे असे का? याची विचारणा करण्यासाठी उपमहापौर तुषार हिंगे यांनी पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी (ता. 22 सप्टेंबर) आयोजित केली होती. मात्र, बैठकीला महापौर उषा ढोरेंसह केवळ आठ नगरसेवकच उपस्थित होते. विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांचीही गैरहजेरी होती. 

महापालिका भवनात दुपारी साडेचारला बैठक सुरू झाली. याला स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, नगरसेवक अभिषेक बारणे, तुषार कामठे आणि अतिरिक्त आयुक्त अजित पवार, पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शहरातील 32 प्रभागांतून 128 नगरसेवक निवडून आले आहेत. प्रत्येक प्रभागात अनियमित, अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. 

बैठकीत हिंगे उपरोधिक म्हणाले, ""गढूळ पाण्यासंदर्भात अद्ययावत प्रणालीने क्‍लोरिनची नवी काही पद्धत असेल तर ती त्वरित अमलात आणा. जेणेकरून गढूळ पाण्याविषयीच्या तक्रारी कमी होतील.'' यावर संबंधित अधिकाऱ्यांना काहीच सांगता आले नाही. प्राधिकरणातील सेक्‍टर 23 मधील जलशुद्धीकरण यंत्रणा निकामी झाली आहे. सहा महिन्यांपासून काही नियोजन नसल्याने पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांनी कनिष्ठ अभियंत्यांना नोटीस बजावली आहे. याचीही माहिती तांबे यांना नसल्याचे उघड झाले. 

""शहरात गढूळ पाणीपुरवठा होत आहे. नागरिक आजारी पडत आहेत. त्यासाठी तुम्ही नियोजन केले आहे का?'' असा सवाल महापौर ढोरे यांनी केला. 

""धरण भरलेले असताना दिवसाआड पाणीपुरवठा का करताय? तसेच दिवसाआड पाणीपुरवठा करूनही कमी दाबाने का केला जातो? या माहिती द्यावी," अशी विचारणा चिखले यांनी अधिकाऱ्यांना केली. 

अभ्यास करून माहिती देतो 

बैठकीत पाणीपुरवठा विषयक प्रश्‍नांबाबत चर्चा करण्यात आली. मात्र, तांबे यांना काहीच सांगता आले नाही. विचारलेल्या प्रत्येक प्रश्‍नांवर मी अभ्यास करून माहिती देतो, असे उत्तर देत राहिले. नंतर त्यांनी तीन दिवसांची मुदत मागून घेतली. 

अभियंत्यास एकाही प्रश्‍नाचे उत्तर देता येईना 

उपमहापौरांनी पाण्याविषयी 15 मुद्यांचा अजेंडा तयार केला होता. मात्र, त्यापैकी एकाही प्रश्‍नांची उत्तरे तांबे यांना देता आली नाहीत. त्यांना कोरोना काळात केंद्र व राज्य सरकार यांनी आखून दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वे, नियम व अटी-शर्ती याविषयी एकही शब्द सांगता आला नाही. त्यामुळे हिंगे यांनी निषेध नोंदवत सभात्याग केला. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in