पिंपरी महापालिका वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. साळवेंना आयुक्त पाटलांचा दणका...  

आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी हटवले आहे.
पिंपरी महापालिका वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. साळवेंना आयुक्त पाटलांचा दणका...  
Sarkarnama Banner (28).jpg

पिंपरीः कोरोनात साफ फेल गेलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वैद्यकीय विभागप्रमुख तथा अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी हटवले आहे. एवढेच नाही, तर निविदांसह वित्तीय अधिकारही काढून घेण्यात येऊन त्यांना जोरदार दणका दिला आहे. डॉ. साळवेंच्या कारभाराबाबत सत्ताधारी व विरोधक अशा दोघांकडूनही मोठी ओरड झाली होती.

पाटील यांनी १५ फेब्रुवारीला रुजू झाल्यानंतर दोन महिन्यातच आपल्या कामाची चमक दाखवली आहे. अकार्यक्षम आणि चुकार अधिकाऱ्यांना त्यांनी दणका देण्यास सुरवात केली आहे. एकही रुग्ण दाखल न झालेल्या भोसरीतील दोन कोरोना सेंटर चालविणाऱ्या स्पर्श हॉस्पिटलला सव्वातीन कोटी रुपयांचे बिल देणारे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांचे वित्तीय अधिकार आयुक्तांनी प्रथम गेल्या महिन्यात काढले. नंतर त्याप्रकरणी चौकशी लावली. तर, पुण्यात जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून बदली होऊनही पालिकेत थांबलेल्या अजित पवारांना त्यांनी या महिन्यात पालिकेतून मुक्त केले.

पवारांबरोबर आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय हे सुद्धा गेल्या महिन्याच्या पालिका सभेत लक्ष्य झाल्याने त्यांचेही वित्तीय अधिकार आयुक्तांनी लगेचच काढले होते. तर, या महिन्यात काल (ता. ११) त्यांनी वैद्यकीय विभागात खांदेपालट करताना आरोप झालेल्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करीत कार्यक्षम अधिकाऱ्यांना संधी दिली आहे.

कोरोनाचा वाढता प्रार्दूभाव लक्षात घेऊन वेगाने काम व्हावे, त्यात पारर्दशकता यावी आणि नागरिकांना तातडीने सुविधा मिळण्यासाठी आरोग्य व वैद्यकीय विभागात हा नियोजनबद्ध सुसूत्रीकरण केल्याचे आयुक्तांनी या आदेशात म्हटले आहे. त्याचाच अर्थ नागरिकांना आरोग्य सुविधा तेवढ्या तत्पर मिळत नव्हत्या. तसेच आरोग्य व वैद्यकीय विभागाच्या कामही तेवढे पारदर्शक आणि वेगवान नव्हते असे या आयुक्तांच्या स्वयंस्पष्ट आदेशातून सूचित होत आहे.

सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांना साळवेंची जागा व अधिकार देण्यात येऊन आयुक्तांनी त्यांच्यावर मोठा विश्वास टाकला आहे. गेल्याच महिन्यात ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी असलेले गोफणे यांना सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली होती. तर, या महिन्यात त्यांच्यावर त्याहीपेक्षा खूप मोठी व महत्वाची अशी जबाबदारी टाकण्यात आली आहे.

वैद्यकीय विभागाचे प्रमुख म्हणून त्यांना आता काम करायचे आहे. या विभागाच्या सर्व निविदांचे व बिले अदा करण्याचेही कामही त्यांच्याकडे देण्यात आले आहे. वायसीएम वगळता इतर सर्व महापालिका रुग्णालयांचे आस्थापना व प्रशासकीय कामकाजही तेच पाहणार आहेत. मानधनावर मनुष्यबळ घेण्याचे अधिकारही त्यांना देण्यात आले आहे. तर, डॉ. साळवेंना आता सर्व कोरोना सेंटर व जंबो हॉस्पिटलचे पर्यवेक्षण आणि पुणे विभागीय आयुक्तांशी पत्रव्यवहार करून समन्वय ठेवण्याचे कारकुनी काम सोपविण्यात आले आहे.

डॉ. राय यांच्याकडील आरोग्य विभागाचे प्रमुख तथा आऱोग्य वैद्यकीय अधिकारी ही जबाबदारी कायम ठेवली गेली असून त्याजोडीने पालिकेतील कोरोना वॉररुमचे कामही दिले गेले आहे. तर, वैद्यकीय अधिकारी वर्षा डांगे यांना कोरोना चाचणी तसेच लसीकरणाचे प्रमुख करण्यात आले आहे.

Edited by: Mangesh Mahale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in