लसीकरण थांबले...दुसरा डोस न झालेले  ४५ वर्षावरील सर्व धास्तावले... - Pimpri Chinchwad Vaccination second dose was not received  | Politics Marathi News - Sarkarnama

लसीकरण थांबले...दुसरा डोस न झालेले  ४५ वर्षावरील सर्व धास्तावले...

उत्तम कुटे
सोमवार, 3 मे 2021

४५ वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण थांबल्याने दुसरा डोस न मिळालेले डेंजर झोनमधील नागरिक हवालदिल झाले आहेत.

पिंपरी : कोरोना मोहिमेला लसीचा अत्यल्प पुरवठा होत असल्याने  पिंपरी-चिंचवडमध्ये करकचून ब्रेक लागला आहे. दररोज आठ हजार जणांचे होणारे लसीकरण आता फक्त सहाशेवर आले आहे. ४५ वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण पूर्ण थांबल्याने दुसरा डोस न मिळालेले डेंजर झोनमधील हे नागरिक हवालदिल झाले आहेत. शहरातील ७९ लसीकरण केंद्रांपैकी लसच उपलब्ध होत नसल्याने फक्त तीनच केंद्र सध्या सुरु आहेत. तेथे दररोज फक्त सहाशे जणांनाच लस दिली जात आहे. .

दरम्यान, या महिन्यात दहा लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचा पिंपरीचे महापौर माई ढोरे यांचा निश्चयही लसीअभावी पूर्णत्वास जाणार नाही,असे स्पष्ट दिसत आहे. कारण २५ लाख लोकसंख्येच्या शहरात गेल्या तीन महिन्यात फक्त चार लाख २ हजार ३३३ जणांचेच लसीकरण झाले आहे. दुसरीकडे शहवासियांना मोफत लस देण्याची सत्ताधारी भाजपची घोषणाही हवेतच राहण्याची दाट शक्यता आहे. कारण लसीची टंचाई ही पुढील दोन-तीन महिने राहणार आहे, असे सिरम संस्थेचे अदर पूनावालांनी नुकतेच म्हटले आहे. लसच उपलब्ध होत नसल्याने शहरातील पालिकेच्या साठपैकी फक्त तीन लसीकरण केंद्रे सुरु आहेत. तर, सर्व १९ खासगी लसीकरण केंद्र १ तारखेपासून बंद पडली आहे. त्यामुळे दुसऱ्या डोसची वेळ झालेल्यांना तो सशुल्क घेण्याचीही सोय आता राहिलेली नाही. दरम्यान, शहरात दररोज आठ हजारावर होणारे हे लसीकरण १ मे पासून फक्त सहाशेवर आले आहे.
 
दुसरीकडे १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण १ मे  पासून सुरु झाले, मात्र, त्याचवेळी डेंजर झोनमधील ४५ वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण शहरात पूर्ण बंद पडले आहे. १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणही टोकण स्वरुपातच सुरु आहे.  शहरातच नाही, तर देशातही याच वयोगटात सर्वाधिक लोकसंख्या आहे. पण, सध्या फक्त या वयोगटातील सहाशे जणांनाच ही लस शहरात देण्यात येत आहे. ती सुद्धा ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे, त्यांनाच ही लस फक्त तीन केंद्रांवर दिली जात आहे. शहरात गेल्या काही दिवसापासून दररोज दोन हजारावर कोरोनाचे नवे रुग्ण आणि नव्वदच्या वर मृत्यू होत आहे. त्याला ब्रेक म्हणून, तरी लसीकरण मोहीम वेगात होणे नितांत गरजेचे असताना तिलाच ब्रेक बसला आहे. परिणामी प्रशासनाची, मात्र चिंता वाढली आहे. दुसरा डोसचा कालावधी पूर्ण झालेल्या ४५ वरील अनेकांचीही प्रशासनासारखी स्थिती झाली आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख