कष्टकरी नेत्याला मारहाण एनसी दाखल; पोलिसाला मारहाण थेट गुन्हा नोंद 

मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या कष्टकरी कामगार नेत्याला व त्याच्या पत्नीला जखमा होईपर्यंत पोलिसांनी मारहाण केली.
 Pimpri-Chinchwad, Political .jpg
Pimpri-Chinchwad, Political .jpg

पिंपरी : मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या कष्टकरी कामगार नेत्याला व त्याच्या पत्नीला जखमा होईपर्यंत पोलिसांनी मारहाण केली. मात्र, त्याबाबत फक्त एनसी म्हणजे अदखलपात्र गुन्हा सोमवारी नोंदविण्यात आला. मात्र, या नेत्यानेच महिला वाहतूक पोलिसाची हात व गचांडी धरून थोबाडीत मारल्याबद्दल त्याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणून विनयभंग केल्याचा गंभीर सेशनकमिट गुन्हा पोलिसांनी सोमवारी (ता. २६ एप्रिल) दाखल करून या नेत्याला अटक केली.

मारहाण व गुन्हा दाखल होऊन अटक झालेले प्रल्हाद कांबळे (वय ५१,रा. पिंपरी) हे कष्टकरी कामगार पंचायत व महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांचे मोठे चूलत बंधू असल्याने या घटनेची शहरात कालपासून चर्चा आहे. प्रल्हाद कांबळे हे कष्टकरी कामगार पंचायतीचे कोषाध्यक्ष, तर टपरी पथारी हातगाडी पंचायतचे सचिव आहेत.

पिंपरी पोलिसांच्या म्हणण्यानुसार महमंद मौल शेख (वय ३३) हा रिक्षाचालक (एमएच-१४-एमएच-९०७८) पिंपरी चौकातून नो एंट्रीत घुसल्याने तेथील महिला वाहतूक पोलिस अश्विनी सकपाळ यांनी त्याच्याकडे लायसन्स व गाडीची कागदपत्रे मागितली. तीन दिल्याने त्याला जवळच असलेल्या पिंपरी वाहतूक विभागाच्या चौकीत नेण्यात आले. तेथे खटला नोंदवण्याचे काम त्या करीत असताना कांबळे तेथे आले. त्यांनी सरकारी कामात अडथळा आणला.

तसेच आपला हात व गचांडी पकडून दोन थोबाडीत मारल्याचा दावा सकपाळ यांनी केला आहे. तर, प्रल्हादला व त्याच्या पत्नीला पोलिसांनीच मारले असून या दोघांच्याही अंगावर त्याच्या जखमा आहेत, असे बाबा कांबळे म्हणाले. या मारहाणीबाबत पोलिस गुन्हाच दाखल करून घेत नव्हते. शेवटी कशीबशी एनसी नोंद केली. कष्टकऱ्यांचे नेते असल्याने प्रल्हाद मदतीसाठी गेले होते. 

मदतीसाठी बोलावले, तर जायचे नाही का अशी विचारणा बाबा कांबळेंनी केली. अशीच दुसरी घटना शहरात नुकतीच (ता.२४) घडली. आपल्या मित्राच्या कोरोनाग्रस्त नातेवाईकाला रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळवून देण्याची मदत करण्यासाठी गेलेल्या वैभव मळेकर या अपक्ष नगरसेविका साधना मळेकर यांच्या महाविद्यालयीन मुलाला पोलिसांनी या औषधाचा काळाबाजार करीत असल्याच्या आरोपावरून त्याच्या मित्रासह अटक केली आहे. पोलिसांच्या या कार्यपद्धतीवर बाबा कांबळेसारखाच प्रश्न नगरसेविका साधना मळेकर यांनीही त्यावेळी उपस्थित केला होता.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत शहरात सरकारी कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्यांत अचानक लक्षणीय वाढ झाली आहे. दररोज एक, तरी असा गुन्हा दाखल होत आहे. त्यातून पोलिस व सरकारी यंत्रणेविरुद्धची चीड व्यक्त होत असून त्यांचा धाक व जरब कमी झाली की काय अशी चर्चाही ऐकायला मिळाली. सरकारी कामात अडथळा आणल्याचा दुसरा गुन्हा देहूरोड पोलिस ठाण्यातही नोंद झाल्याची माहिती पोलिसांनी आज दिली.

समाजकार्य करायचेच नाही का, एखाद्याचा जीव जात असेल, तरीही शांत बसायचे का अशी विचारणा त्यांनी केली होती. अशा प्रकरणात विनयभंग कलमाचा गैरवापर होत असल्याचे निरीक्षण त्यासंदर्भातील खटले लढलेल्या शहरातील एका नामंवत वकिलांनी नोंदवले आहे. विनयभंग नेमका कसा होतो, त्याबद्द्ल न्यायालयानेही नुकताच निकाल दिला आहे. मात्र, हे कलम सेशनकमिट असल्याने अद्दल घडविण्यासाठी वा सूड उगविण्याकरिता त्याचा गैरवापर केला जात असल्याचे हे वकिल म्हणाले.

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com