श्रीमंत महापालिकेचा अजब कारभार; दोन मास्क आणि एका अंडरगार्मेंटसाठी सोळाशे रुपये  

विरोधी राष्ट्रवादी व शिवसेना सदस्यांनीही त्याला आक्षेप घेतला नाही, हे विशेष.
श्रीमंत महापालिकेचा अजब कारभार; दोन मास्क आणि एका अंडरगार्मेंटसाठी सोळाशे रुपये  
Pimpri-Chinchwad .jpg

पिंपरी : महापालिकेची निवडणूक साडेसहा महिन्यांवर आल्याने स्पष्टता नसलेले कोट्यवधी रुपयांचे शंकास्पद विषय धडाधड मंजुर करण्याचा सपाटा आता पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) पालिकेच्या स्थायी समितीने (Standing Committee) सुरु केला आहे. बुधवारच्या (ता.४) बैठकीतही बंद असलेल्या शहरातील शाळांसाठी शालेय साहित्य, पुस्तके विकत घेणे, बंद शाळांत संयत्र बसवणे असे स्पष्टता व तातडीची आवश्यकता नसलेले सहा प्रस्ताव कुठलीही चर्चा न होता मंजूर करण्यात आले. विरोधी राष्ट्रवादी व शिवसेना सदस्यांनीही त्याला आक्षेप घेतला नाही, हे विशेष. (Pimpri-Chinchwad Standing Committee approves many issues) 

स्थायीच्या बैठकीनंतर बंद शाळांसाठी संयत्र, पुस्तके व शालेय साहित्य खरेदीचा विषय एवढा तातडीच्या मंजुरीचा होता का, तो स्थगित ठेवता आला नसता का, अशी विचारणा केली असता स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांना त्याचे समाधानकारक उत्तर देता आले नाही. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याला बोलावणे पाठवूनही ते याबाबत माहिती देण्यास न आल्याने हे प्रस्ताव मान्य होण्यामागील उघड गुपिताची लगेच चर्चा झाली. हे प्रस्ताव किती खर्चाचे आहेत वा किती कोरोना संयत्रे खरेदी करण्यात येणार आहेत, अशी कुठलीही माहिती देणे खुबीने टाळून मान्यता घेतल्याने या विषयांच्या मंजुरीवर शंका उपस्थित झाली आहे.

कोरोनामुळे सध्या बंद असलेल्या पालिकेच्या शाळा कधी सुरु होतील हे नक्की नाही. तरीही या शाळांचा दर्जा खासगी शाळांसारखा करण्याकरिता, पटसंख्या सुधारून शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी मायमराठी अक्षर लेखन प्रकल्प हे पुस्तक खरेदीस मान्यता देण्यात आली. पण, किती रुपयांचे हे पुस्तक असून ती किती खरेदी केली जाणार आहेत, त्यासाठी किती खर्च येणार आहे, ही माहिती न देता त्याच्या खरेदीस मात्र, मंजुरी घेण्यात आली. दुसरा असाच भेदभाव करणारा चार कोटी रुपये खर्चाचा विषय कसलीही चर्चा न होता घाईघाईने मंजूर केला गेला. 

पालिका शाळा सध्या बंद आहेत. तरीही तेथील विद्यार्थ्यांना वगळून फक्त विद्यार्थिनींना दोन डबललेअरचे मास्क आणि त्याजोडीने अंडरगार्मेंट देण्याचा हा वादाचा प्रस्ताव आहे. फक्त दोन मास्क आणि एक अंडरगार्मेंट असलेल्या या गुडफिल किटसाठी पालिका १५९९ रुपये मोजणार आहे. बाजारभावापेक्षा हा दर काहीपट आहे. शाळा बंद असल्याने हे किट मुलींना कसे देणार ह स्पष्ट केले गेलेले नाही. शाळा बंद असल्याचे नमूद करीत शालेय वह्या खरेदीचा तिसरा विषयही स्थायी समितीने आजच्या बैठकीत मंजूर केला, हे विशेष. पण, किती वह्या, किती विद्यार्थ्यांसाठी घेणार याची माहिती, मात्र देण्यात आली नाही. तर, मान्य केलेला चौथा मान्य विषय, तर धक्कादायक आहे. त्यात चार लाख ९६ हजार पाचशे रुपयांची १२० पुस्तके विकत घेण्यात येणार आहेत. म्हणजे एक पुस्तक चार हजार १४० रुपयांना पडले आहे. 

ग्रंथाचीही एवढी किंमत नसताना अशा कुठल्या पुस्तकासाठी पालिकेने चार हजार रुपये मोजलेत, याची खमंग चर्चा पालिकेत रंगली आहे. तसेच ती बंद असलेल्या शाळांसाठी तातडीने खरेदी का केली गेली आहेत, हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित करण्यात आला आहे. असाच पाचवा बंद शाळांतील पहिली ते आठवीच्या ४९ हजार मुला-मुलींना शालेय साहित्य खरेदीचा विषयही मंजूर केला गेला आहे. पण, किती खर्चास मान्यता हे, मात्र नमूद केले गेलेले नाही. या विषयाच्या प्रस्तावनेत शाळा १ ऑगस्ट रोजी सुरु होणार असल्याचे प्रस्तावित असल्याचे रेटून खोटे सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात शाळा १ ऑगस्ट उलटून गेल्यानंतरही सुरु झालेल्या नाहीत.  तसेच कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांना लक्ष्य करण्याची शक्यता असल्याने त्या लवकर सुरु होण्याचाही संभव नाही. 

तरीही या खरेदीस मान्यता घेण्यात आल्याने ती टक्केवारीसाठी असल्याला दुजोरा मिळाला आहे. या बंद शाळांत युव्हीसी स्कॅंझ हे कोरोना विषाणू मारणारे सय़ंत्र बसविण्याचा मान्यता दिलेला सहावा विषयही असाच आहे. अशी किती यंत्र घेणार, केवढ्याला घेणार, त्याला एकूण किती खर्च येणार आहे, बाजारभावात ते कितीला उपलब्ध आहे, हे, मात्र दडवून ठेवण्यात आले आहे. एकूणच बुधवारच्या बैठकीत अशाच शंकास्पद व स्पष्टता नसलेले कोट्यवधी रुपयांचे विषय धडाधड चर्चेविना मंजूर करण्यात आले आहेत. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in