तो बाका प्रसंग निभावला; पण, पिंपरी चिंचवडवर टांगती तलवार कायम! - Pimpri Chinchwad is relieved to two oxygen tankers   | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

तो बाका प्रसंग निभावला; पण, पिंपरी चिंचवडवर टांगती तलवार कायम!

उत्तम कुटे 
बुधवार, 21 एप्रिल 2021

ऑक्सिजन साठाच संपत आल्याने मंगळवारी (ता. २० एप्रिल) रात्री पिंपरी-चिंचवडवर मोठा बाका प्रसंग आला होता.

पिंपरी : ऑक्सिजन साठाच संपत आल्याने मंगळवारी (ता. २० एप्रिल) रात्री पिंपरी-चिंचवडवर मोठा बाका प्रसंग आला होता. पण, ऐनवेळी पालिका प्रशासनाने धावपळ करून २२ टन ऑक्सिजनचा (तीन टॅंकर) बंदोबस्त केल्याने संभाव्य अनर्थ टळला. दरम्यान, या घटनेतून धडा घेत प्रशासनाने ऑक्सिजनची आणीबाणी टाळण्यासाठी ऑक्सिजन व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे. 

सोमवारी व मंगळवारी ऑक्सीजनचा पुरवठा न झाल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. कारण काही तास पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक राहिल्याने ऑक्सिजनवर असलेल्या तेवीसशे कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची धडधड वाढली होती. त्यामुळे शहराचे कारभारी आणि भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी मंगळवारी (ता.२०) रात्री उशीरा फेसबुक लाईव्हदारे दुजाभाव न करता पिंपरी-चिंचवडला तातडीने ऑक्सीजन देण्याची मागणी अन्न आणि औषध प्रशासनाकडे केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॅाकडाऊनबाबत केंद्र सरकारची भूमिका केली स्पष्ट

एफडीएचे अधिकारी फोन उचलत नसून मेसेजलाही ते उत्तर देत नसल्याची उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली होती. ऑक्सिजनअभावी अनेक रुग्ण हे मृत्यूच्या दारात गेले असल्याने ते फेसबुक लाईव्ह करताना खूप चिंताग्रस्त दिसले होते. दुसरीकडे मंगळवारीच ऑक्सिजन संपल्याने चाकण (ता. खेड, जि. पुणे) येथील एका खासगी रुग्णालयातील तीन रुग्ण मरण पावल्याने पिंपरी-चिंचवडमधील दाखल गंभीर कोरोना रुग्णांचे नातेवाईक ऑक्सीजनच्या तुटवडा निर्माण झाल्याने घाबरून गेले होते. 

खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी रुग्णालय परिसरात बंदोबस्त वाढवला होता. ही परिस्थिती ध्यानात घेऊन पालिका आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आणि उपायुक्त तथा ऑक्सिजन समन्वयक स्मिता झगडे यांनी वेगाने हालचाल करीत पुणे विभागीय आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून २२ टन ऑक्सिजन मिळवला. त्यामुळे प्रशासनच नाही, तर रुग्ण आणि ते दाखल असलेल्या खासगी रुग्णालयाच्या चालकांचा जीव भांड्यात पडला. मात्र, आजची सोय झाली. उद्या व नंतरचे काय अशी चिंता पिंपरी-चिंचवड हॉस्पिटल ओनर असोसिएशनचे सचिव डॉ प्रमोद कुबडे यांनी व्यक्त केली आहे. 

त्यामुळे ऑक्सीजनवर असलेल्या गंभीर रुग्णांच्या नातेवाईकांना सोय करण्यास सांगितले असल्याची माहिती त्यांनी दिली. दुसरीकडे पालिकेचीही रुग्णालये व कोविड सेंटर फुल झाल्याने खासगी रुग्णालयातील ऑक्सिजनवरील गंभीर रुग्णांना हलवायचे कुठे ही चिंता त्यांच्या नातेवाईकांना भेडसावू लागली आहे.

रेमडिसिव्हिर इफेक्ट : FDA आयुक्त अभिमन्यू काळेंना हटवले; सर्व मंत्र्यांचे चेहरे उजळले!
 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णालये, तर फुल झाली आहेच, पण या रुग्णांना लागणारे रेमडेसिव्हिर, प्लाझ्मा आणि ऑक्सिजनचाही तुटवडा जाणवू लागला आहे. तो प्रशासनानेही आज मान्य केला. त्याचवेळी ऑक्सिजन संपला नव्हता, हे ही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शहरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा करण्यामध्ये पुणे जिल्हा प्रशासन दुजाभाव करीत असल्याचा आरोप शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे.

यासंदर्भात ते म्हणाले, शासकीय रुग्णालयासाठीचे ऑक्सिजन टँकर काल व परवा शहराला दिले गेले नाहीत. रेमडेसिव्हिर इंजेक्शनबाबतही एफडीए पिंपरी-चिंचवडकरांशी असाच दुजाभाव करीत आहे. ऑक्सिजन पुरवठा झाला नाही तर ऑक्सिजन बेडवर असलेले शेकडो रुग्ण दगावण्याची भीती आहे. त्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र शासनाची असेल.

दरम्यान, ऑक्सिजनच्या आणीबाणीसदृश परिस्थितीतून धडा घेत पालिका आयुक्तांनी दहा अधिकाऱ्यांची ऑक्सिजन मॉनिटरिंग टीम स्थापन केली आहे. त्यात कार्यकारी अभियंता दर्जाचे तीन समन्वय अधिकारी, तर बाकीचे सदस्य हे उपअभियंते आहेत. तर, अगोदरच पालिकेच्या उपायुक्त स्मिता झगडे या ऑक्सिजन समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. त्या व ही टीम आता ऑक्सिजन मागणी व पुरवठ्याच्या समन्वयाचे काम पाहणार आहेत. 

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख