लॅपटॉप आणि कलर प्रिंटरच्या सहाय्याने चलनी नोटांची छपाई, पिंपरी चिंचवड पोलिसांनी पकडली टोळी

सतत १८ दिवस पुणे, सातारा, मुंबई आणि पालनपूर (गुजरात) येथे तपास करून सहाजणांच्या या आंतरराज्यीय टोळीला अटक करण्यात आली आहे.
Crime.jpg
Crime.jpg

पिंपरीः  कुठलीही छपाईची आधुनिक यंत्रसामग्री न वापरता फक्त लॅपटॉप आणि कलर प्रिंटरच्या सहाय्याने दोन हजार व पाचशे रुपये मूल्याच्या नकली नोटा छापणारे रॅकेट पिंपरी चिंचवड (Pimpri chincwad) पोलिसांनी उघडकीस आणले आहे. (Pimpri-Chinchwad police nab gang for printing currency notes with laptops and color printers)

सतत १८ दिवस पुणे, सातारा, मुंबई आणि पालनपूर (गुजरात) येथे तपास करून  सहाजणांच्या या आंतरराज्यीय टोळीला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३२ लाख ३७ हजार रुपयांच्या नकली नोटा व इतर ऐवज असा ३२ लाख ६७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सांगितले. निगडी पोलिसांच्या या कामगिरीचे त्यांनी सोमवारी (ता. १२) तोंड भरून कौतूक केले.

बनावट नोटा छापून त्या चलनात आणणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश नकली नोटा वितरणासाठी आलेल्या या टोळीतील एकजण पकडला गेल्याने झाला. सहाजणांच्या या टोळीतील एकही स्थानिक नाही. एकेक सोलापूर,सातारा आणि ठाणे,तर बाकीचे तिघे गुजरातमधील आहेत.

गोरख दत्तात्रेय पवार (वय ३०, रा. भाळवणी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे या साखळीत पकडल्या गेलेल्या पहिल्या आऱोपीचे नाव आहे. ओटास्कीम, निगडी येथील स्मशानभूमीजवळ त्याला पकडण्यात आले. तेव्हा त्याच्याकडे पाच लाख ८६ हजाराच्या बनावट नोटा मिळून आल्या. त्याच्या चौकशीतून एकेक कडी जोडत या नोटांची छपाई करणाऱ्यापर्यंत पोलिस पोचले.

दरम्यान, त्यासाठी त्यांना पिंपरी चिंचवड, सोलापूर, सातारा, मुंबई ते गुजरात असा दोन राज्यांत सतत १८ दिवस तपास करावा लागला. विठ्ठल गजानन शेळके (वय ३८,  ढेबेवाडी, ता. पाटण, जि. सातारा), जितेंद्र रंकनिधी पाणीग्रही (वय ३६, रा. नालासोपारा पूर्व), राजू ऊर्फ रणजितसिंह फतूभा परमार (वय ३८), जितेंद्र नटवरभाई पटेल (वय २६), किरणकुमार कांतीलाल पटेल (वय ३८, तिघेही रा. गुजरात) असे या टोळीतील इतर आऱोपी आहेत.

दोन्ही पटेल हे लॅपटॉप व कलर प्रिंटर याच्या मदतीने दोन हजार व पाचशे रुपयांच्या नकली नोटा छापत होते. तर, बाकीचे आरोपी त्या चलनात आणत होते.
 

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com