आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप यांच्यात लवकरच पॅचअप.. 

शहराच्या दोन्ही कारभाऱ्यांचे गट असून त्यांच्यातील वाद स्थायी समितीच्या बैठकांत अनेकदा समोर आला आहे.
आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप यांच्यात लवकरच पॅचअप.. 
mllg17.jpg

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचे भाजपचे कारभारी आमदार दादा (भोसरीचे महेशदादा लांडगे) आणि भाऊंत (चिंचवडचे लक्ष्मणभाऊ जगताप) लवकरच पॅचअप होईल, असा विश्वास शहराच्या भाजपच्या नवनियुक्त प्रभारी आणि पुण्यातील पक्षाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केला. सगळ्यांशी चर्चा करून पुढील वर्षीच्या महापालिका निवडणुकीसाठी लवकरच प्लॅन तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


शहराच्या दोन्ही कारभाऱ्यांचे गट असून त्यांच्यातील वाद स्थायी समितीच्या बैठकांत अनेकदा समोर आला आहे. त्यामुळे त्यात नुकतीच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मुंबईत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर कुठे स्थायीचे काम सुरळीत झाले आहे. या कारभाऱ्यांतील मतभेदाविषयी विचारणा केली असता त्यांचे म्हणणे प्रथम ऐकून घेईन व त्यानंतर त्यांच्यात समेट झालेला दिसेल, असा आशावाद मिसाळ यांनी व्यक्त केला. आठवड्यातून दोन दिवस पिंपरी-चिंचवडमध्ये येण्याचा मनोदय असल्याचे त्या म्हणाल्या. येत्या गुरुवारी वा शुक्रवारी आपण उद्योगनगरीत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

चंद्रकांतदादांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून पुन्हा सूत्रे हाती घेतल्याला वर्ष पूर्ण झालेल्या दिवशी म्हणजे कालच (ता. १६) मिसाळ यांची नियुक्ती झाली आहे. प्रदेशाध्यक्ष होताच चंद्रकांतदादांनी प्रथम जिल्हाध्यक्ष नव्याने नेमले. त्यानुसार पिंपरी-चिंचवडमध्ये भाऊंच्या जागी दादा आले. तर, चार महिन्यांपूर्वी त्यांनी आपली कार्यकारिणी जाहीर केली. त्यात शहरातील अमीत गोरखे यांना प्रदेश सचिवपदी संधी दिली गेली. नव्या टीमचा भाग म्हणून आता शहर प्रभारी नियुक्त करण्यात आले आहेत.  सांगलीचे मकरंद देशपांडे हे उद्योगनगरीचे अगोदर प्रभारी होते. त्यांचे प्रमोशन होऊन ते पश्चिम महाराष्ट्राचे संघटनमंत्री झाल्याने त्यांच्याजागी मिसाळ यांची नेमणूक काल करण्यात आली. आपल्या संघटनेतील प्रदीर्घ अनुभव व कामाचा फायदा पक्ष वाढीसाठी पिंपरी-चिंचवडमधील निश्चीत होईल, असे नमूद करून सर्वांना सोबत घेऊन ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाड़ाल,अशी अपेक्षा प्रदेशाध्यक्षांनी मिसाळ यांच्याकडून व्यक्त केली आहे.

आमदार माधुरी मिसाळ यांची पिंपरी-चिंचवड भाजपच्या प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. 

मिसाळ या २००९ पासून सलग तीन वेळा पर्वती मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करीत आहेत. सध्या विधानसभेतील भाजपच्या प्रतोद म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहे. राज्य सरकारच्या 'सार्वजनिक उपक्रम  समिती' आणि महिला सबलीकरणासाठी स्थापन केलेल्या 'शक्ती कायदा समिती'च्या त्या सदस्या आहेत. प्रदेश चिटणीस, पुणे शहर अध्यक्ष, बारामती लोकसभा प्रभारी अशा विविध संघटनात्मक पदांवर त्यांनी काम केले आहे.

Edited  by : Mangesh Mahale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in