मुंडे समर्थक नाराजीचे लोण पिंपरी-चिंचवडपर्यंत; ओबीसी मोर्चाच्या उपाध्यक्षांनी दिला राजीनामा 

जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायत समिती सदस्य अशा ३६ पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत आपले राजीनामे दिले आहेत.
 Pritam Munde .jpg
Pritam Munde .jpg

पिंपरी : बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न दिल्याने त्यांच्या समर्थकांनी राजीनामा देण्याचे सत्र सुरु केले आहे. बीड, नगरचे हे लोण आता पुणे जिल्ह्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजपच्या ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष दत्ता कायंदे यांनी पदाचा व पक्षाचाही राजीनामा दिला, असल्याचे 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. (Pimpri-Chinchwad OBC Morcha Vice President resigns) 

भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गेल्यावर्षी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील त्यांच्या समर्थक व भाजपच्या शहर जिल्हा ओबीसी महिला मोर्चाच्या अध्यक्षा सारिका पवार यांनीही गेल्यावर्षी ५ नोव्हेंबरला पक्ष सोडला होता. भाजपचे ते पहिले आऊटोगोईंग ठरले होते. त्यांनी यावर्षी १९ मे रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. ते राष्ट्रवादीचे पहिले इनकमिंग होते. त्यानंतर आता भाजपच्या पुरुष ओबीसी पदाधिकाऱ्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

मुंडे यांना मंत्री न केल्याने त्या तसेच माजी मंत्री पंकजा मुंडे व भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे पाठीराख्यांत मोठी अस्वस्थता पसरली आहे. बीड जिल्ह्यात ती सर्वाधिक आहे. त्यामुळे तेथील पदाधिकाऱ्यांनी आपल्या नेत्याला मंत्रीपद न दिल्याच्या निषेधार्थ राजीनाम्याचे हत्यार उपसले आहे. त्याचा कित्ता नंतर नगरलाही गिरवला गेला. जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायत समिती सदस्य अशा ३६ पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत आपले राजीनामे दिले आहेत. हे लोण आता पिंपरी चिंचवडला पोचले. मुंडेंचे कट्टर समर्थक कायंदे यांनी व्हाट्स अॅपवर आपला राजीनामा शहर ओबीसी मोर्चा अध्यक्ष ऋषीकेश रासकर यांच्याकडे पाठवून दिला. 

सही व तारीख नसलेला हा राजीनामा त्यांनी सरकारनामाकडेही पाठवला. सही नाही व तारीखही नाही, अशी विचारणा केली असता आपण पदाचाच नाही, तर पक्षाचाही राजीनामा दिला असल्याचे कायंदे यांनी सांगितले. तसेच उद्या पंकजा मुंडे यांची मुंबईत भेट घेणार असून त्यानंतर काय करायचे ते ठरवू, असेही ते म्हणाले.

दरम्यान, कायंदेंचा लेखी राजीनामा आपल्याकडे आलेला नसल्याचे रासकर यांनी सांगितले आहे. उद्या पंकजाताईंची भेट घेतल्यानंतर त्यांचा राजीनाम्याचा निर्णय बदलूही शकतो, असे ते म्हणाले. तसेच पद देताना शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या परवानगीने घेतो, तसेच कोणी पद सोडत असेल, तर त्याबाबतही शहराध्यक्षांशी बोलावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com