मिळकतकरावरून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद

पिंपरीत शास्तीच्या या तात्पुरत्या दिलाशावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये, मात्र कायमचा ठरलेला कलगीतुरा पुन्हा रंगला आहे.
मिळकतकरावरून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद
3pcme13f.png

पिंपरी : शास्ती वगळून मिळकतकर भरण्यास राज्य सरकारने तात्पुरती सवलत दिल्याने कोरोना काळात अगोदरच आर्थिक अडचणीत आलेल्या रहिवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे शास्ती आणि नंतर कोरोनामुळे थकलेला शेकडो कोटींचा थकित मिळकतकर वसुलीचा मार्ग मोकळा झाल्याने पालिकेलाही दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पिंपरीत शास्तीच्या या तात्पुरत्या दिलाशावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये, मात्र कायमचा ठरलेला कलगीतुरा पुन्हा रंगला आहे.

आपल्या पाठपुराव्यामुळेच हा तात्पुरता का होईना दिलासा मिळाल्याचा दावा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन घाईघाईने काल केला.तर, हे सवलतीचे तात्पुरते गाजर असून पूर्ण शास्ती देण्याची केलेली आमची मागणी राज्य सरकारने मान्य करून पूर्ण दिलासा द्यावा, असा प्रतिहल्ला राष्ट्रवादीच्या या श्रेयबाजीवर लगेचच भाजपने चढवला.

प्रत्यक्षात यासंदर्भात पिंपरी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबत राज्याच्या नगरविकास विभागाला पत्र दिले होते. त्यामुळे त्यांनाच त्याचे उत्तर नगरविकास विभागाने देत ही सवलत देत असल्याचे कळवले आहे. ही सवलत फक्त ३१ मार्चपर्यंत आहे.त्यानंतर पुढील आर्थिक वर्षापासून पुन्हा जोमाने शास्तीची वसुली कठोरपणे करण्यास राज्य सरकारने पालिकेला बजावले आहे.

या तात्पुरत्या शास्तीमाफीचा लाभ शहरातील पालिकेतील ३३ मिळकतधारकांना होणार असल्याची माहिती पालिकेच्या करसंकलन विभागातून देण्यात आली. शास्ती व कोरोनामुळे मिळकतकराची ६७१ कोटी रुपयांची थकबाकी (त्यात कराची रक्कम,तर बाकीचा शास्तीचा दंड) असून यामुळे त्यातील काही वसूल होईल,असा आशावादही या विभागाने व्यक्त केला आहे.

शास्ती वसुलीसाठी जप्तीच्या नोटीसा पालिकेने बजावणे सुरु केल्यानंतर त्या थांबविण्यासाठी पहिल्यांदा भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना २९ डिसेंबर २०२० रोजी पत्र दिले. त्यानंतर पिंप-चिंचवड शास्तीकर निर्मूलन समितीने त्यासाठी ८ जानेवारीला आयुक्तांना पत्र दिले होते. त्यावर हा आदेश येताच आपण यासंदर्भात पाठपुरावा केला होता, असे आज राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, पालिकेतील विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे राजू मिसाळ, शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे आदींनी पत्रकारपरिषद घेऊन सांगितले. तर, हे तात्परत्या सवलतीचे गाजर असल्याचे पालिकेतील सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके हे यांनंतर म्हणाले. संपूर्ण शास्ती माफ करण्याबाबत पालिका सभेचा ठराव पाठविला असताना राज्य सरकारने तात्पुरत्या स्वरुपाचा हा आदेश काढून जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in