छोटा मासा गळाला, तर मोठा मासा पळाला.. दमादमाने कारवाई - Pimpri-Chinchwad Crimes filed against only seven out of 18 contractors  | Politics Marathi News - Sarkarnama

छोटा मासा गळाला, तर मोठा मासा पळाला.. दमादमाने कारवाई

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

पिंपरी-चिंचवड महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या १८ ठेकेदारांपैकी फक्त सातजणांविरुद्धच आतापर्यंत गुन्हे दाखल झाले आहेत.

पिंपरी : बनावट एफडीआर सादर करून पिंपरी-चिंचवड महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या १८ ठेकेदारांपैकी फक्त सातजणांविरुद्धच आतापर्यंत गुन्हे दाखल झाले आहेत. काल नोंदविलेल्या दोन अशा गुन्ह्यांपैकी ३६ हजाराच्या फसवणुकीतील आरोपी कंत्राटदाराला पिंपरी पोलिसांनी पकडले. मात्र, दोन कोटी ९८ लाख पन्नास हजाराचा चुना लावणारा दुसऱ्या गुन्ह्यातील संशयित ठेकेदार, मात्र पोलिसांना मिळाला नाही.

पालिकेची विकासकामे करण्याचे टेंडर घेतली जातात. त्यात सबंधित ठेकेदाराला कामाच्या रकमेच्या विशिष्ट टक्के अनामत म्हणून फिक्स्ड डिपॉजिट रिसीट तथा एफडीआर बॅंकेमार्फत पालिकेकडे ठेवावी लागते. मात्र, ही एफडीआरच सदर १८ ठेकेदारांनी बनावट दिल्याचे आढळले आहे. त्याबाबत पालिकेतील विरोधी राजकीय पक्ष नाही,तर मीडियाने आवाज उठवित हे प्रकरण लावून धरल्यानंतर नाईलाजाने पालिका प्रशासनाला कारवाई करावी लागली आहे.

मात्र, ती दमादमाने टप्यागणिक सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही दिवसांपूर्वी प्रथम पाच, तर काल दोन ठेकेदारांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. या सर्व प्रकरणात पालिकेच्या स्थापत्य विभागातील रिटायरमेंटला आलेले लेखाधिकारी रमेशकुमार जोशी (वय ५८) हे फिर्यादी आहेत. काल दाखल झालेल्या चिटींग व फोर्जरीच्या  गुन्ह्यात बी. के. कंस्ट्रक्शन अॅन्ड इंजिनिअरिंगचे मालक परमेश्वर हनमंत क्यातकेरी (वच ६१) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी पालिकेकडून १७ लाख ५६ हजार नऊशे रुपयांची दोन कामे घेतली होती. त्याबदल्यात दिलेली ३६ हजार रुपयांची टीजेएसबी बॅंक गॅंरटी (एफडीआर) ही बनावट होती. ती त्या बॅंकेने दिलीच नव्हती.२६ जून २०१९ ते १० जुलै २०२० या कालावधीत झालेल्या या फसवणुकप्रकरणी काल गुन्हा दाखल झाला आहे.

तर,अशीच दुसरी बनावट बॅंक गॅंरटी कालच्या दुसऱ्या गुन्ह्यात दोन कोटी ९८ लाख पन्नास हजार रुपयांची राजगुरुनगर (ता.खेड,जि.पुणे) येथील महाराष्ट्र बॅंकेची देण्यात आली होती. त्याबाबत राधिका कंस्ट्रक्शनचे मालकअटल प्रितमदास बुधवानी (रा. थेरगाव) या पालिकेच्या दुसऱ्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.ते,मात्र पोलिसांना मिळून आले नाहीत,असे पिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी सरकारनामाला आज सांगितले.दुसऱ्या फसवणुकीच्या गुन्ह्याचा कालावधीही जुना असून तो २० डिसेंबर २०१९ ते १३ फेब्रुवारी २०२० या दरम्यान घडलेला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख