सत्ता राखण्यासाठी भाजपचा आटापिटा; बैठकांचा सपाटा 

आतापर्यंत पालिका प्रशासनाची तोंड फाटेपर्यंत स्तुती करणाऱ्या पक्ष पदाधिकाऱ्यांनी आता प्रशासनाला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे.
सत्ता राखण्यासाठी भाजपचा आटापिटा; बैठकांचा सपाटा 
Pimpri Chinchwad BJP started working to retain power

पिंपरी  ः निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर आल्याने पिंपरी-चिंचवड महपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनत पक्ष अंग झटकून कामाला लागला आहे. महापौर माई ऊर्फ उषा ढोरे यांनी क्षेत्रीय कार्यालयानिहाय आढावा बैठकांचा झपाटा लावला आहे. तसेच, आतापर्यंत पालिका प्रशासनाची तोंड फाटेपर्यंत स्तुती करणाऱ्या पक्ष पदाधिकाऱ्यांनी आता प्रशासनाला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच सोमवारी (ता. ९) झालेल्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या बैठकीत वाहतुकीस अडथळा ठरणारे खड्डे बुजविण्याचा आदेश महापौरांनी प्रशासनाला दिला. (Pimpri Chinchwad BJP started working to retain power)

दरम्यान, शहरात अतिक्रमण, अनधिकृत फेरीवाले, मोकाट कुत्री, अपुरा पाणीपुरवठा, कमी लसीकरण केंद्रे, अवैध वृक्षतोड तसेच वाढलेली धोकादायक व अपघाताला आमंत्रण देणारी झाडे आदी स्थापत्य, पाणीपुरवठा, विद्युत, पशुवैद्यकीय, उद्यान, जलनि:सारण आणि अतिक्रमण विभागांबाबत तक्रारींची संख्या जास्त असल्याचे या आढावा बैठकीतून दिसून आले. त्या सोडविण्यासाठी महापौरांनी प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे, त्यानंतर पुन्हा अशा बैठका घेऊन हे प्रश्न मार्गाी लागले की नाही, याचा आढावा घेणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

पालिकेत २०१७ च्या निवडणुकीत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपने २००२२ मध्येही ती टिकवण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत, त्यातून गेल्या साडेचार वर्षांत प्रथमच त्यांना नागरी प्रश्नांची प्रकर्षाने जाणीव झाली आहे. नागरिकांचे हे प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्यासाठी भाजप नेत्यांनी कंबर कसली आहे, त्यासाठीच क्षेत्रीय कार्यालयनिहाय बैठकांचा सपाटा लावला आहे.

शहरातील सात क्षेत्रीय कार्यालयांपैकी (प्रभाग) ‘क’ चा अपवाद वगळता इतर सर्व प्रभागांच्या आढावा बैठका घेत महापौरांनी नागरी समस्या जाणून घेतल्या. त्यात विरोधी पक्षापेक्षा सत्ताधारी पक्षाचेच नगरसेवक आपल्या प्रभागातील प्रश्न हिरिरीने मांडताना दिसून आले. नगरसेवकांच्या समस्या सोडविण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर बैठका घेत असून त्यामागील उद्देश शहरातील समस्या सोडविणे हाच आहे, असे महापौर या वेळी म्हणाल्या.

स्मार्ट सिटीच्या गेल्या चार वर्षांपासून सुरु असलेल्या कामामुळे शहरातील ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत इतर भागाच्या तुलनेत जादा खड्डे झाले आहेत, त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा होत असल्याने ते बुजवावेत, असा आदेश कालच्या बैठकीत महापौरांनी दिला.

अतिक्रमणांची पाहणी करण्यात येऊन ती काढण्यात यावीत, हॉकर्स झोन संदर्भात नियोजन करावे, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, लसीकरण केंद्रे वाढवावीत, पाणीपुरवठा सुरळीत करावा, झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी, परस्पर झाडे तोडणाऱ्यांवर कारवाई करावी, आदी मागण्या नगरसेवकांनी या वेळी केल्या.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in