In Pimpri Chinchwad, 71 people died due to corona in 24 hours
In Pimpri Chinchwad, 71 people died due to corona in 24 hours

चिंताजनक : २४ तासांत तब्बल ७१ जणांचा कोरोनाने घेतला बळी

शहरातील एकूण रुग्णसंख्या दोन लाखांच्या जवळ पोचली आहे.

पिंपरी  ः गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये दररोज दोन हजारांवर नवे रुग्ण आणि पन्नासांवर बळी हे समीकरण झाले आहे. आज (ता. २३ एप्रिल) तर तब्बल ७१ मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत. हा आतापर्यंत दररोजचा सर्वात मोठा बळींचा आकडा आहे. दरम्यान, आजही दोन हजार ४१७ नवे रुग्ण पिंपरी चिंचवड शहरात आढळले आहेत,  त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या दोन लाखांच्या जवळ पोचली आहे.

दरम्यान, नेहमीप्रमाणे गेल्या २४ दिवसांत कमी मृत्यू झाले असून बाकीचे अगोदरचेच असल्याचा दावा पालिकेतर्फे आज (ता. २३ एप्रिल) पुन्हा करण्यात आला. गेल्या २४ तासांत फक्त आठ मृत्यू कोरोनाने झाले असून आधीचे मृतांची संख्या आज कळविण्यात आल्याने एकूण बळींचा आकडा मोठा दिसत असल्याचे महानगरपालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यातून मृत व्यक्तींचा आकडा लपविण्याचा हा खेळ पुढे सुरु ठेवण्यात आला आहे.
 
उद्योगनगरीत गुरुवारी (ता. २२ एप्रिल) दोन हजार ५३९ नवीन रुग्ण आढळले होते. तर, ५४ जणांचा मृत्यू या आजाराने झाला होता. आज नव्या रुग्णसंख्येत किंचीत घट झाली असली, तरी बळींचा आकडा मात्र मोठा झाला आहे. २४ हजार १४३ सक्रिय रुग्णांपैकी बहुतांश (१५, ७५९) गृह विलगीकरणात आहेत. उर्वरित (८, ३८४) महापालिका व खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत.


हेही वाचा : कोरोनासाठी जगतापांचे २५ लाख, लांडगेंचे एक कोटी, तर बनसोडेंचे सव्वा कोटी
 
पिंपरी : पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आपल्या आमदार निधीतून सव्वा कोटीचे सिटी स्कॅन मशिन शहरात महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात बसविण्याचा प्रस्ताव पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांना आज दिला. त्यामुळे कोरोना रुग्णांचे सध्या सशुल्क सिटी स्कॅन आता मोफत होणार आहे. 

दरम्यान, अण्णा बनसोडे यांच्या प्रस्तावामुळे पिंपरी चिंचवडमधील तीनही आमदारांच्या आमदार निधीतून कोरोनासाठी योगदान मिळाले आहे. प्रथम चिंचवडचे भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी आपल्या आमदार निधीतून २५ लाख रुपयांची रेमडेसिव्हीर इंजेक्शन शहरातील कोरोना रुग्णांना देण्यासाठी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाला देण्याचा प्रस्ताव दिला.

त्यानंतर भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी एक कोटी रुपये आपल्या आमदार निधीतून पालिकेच्या भोसरी रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारणीकरिता दिले होते. त्यामुळे आमदार बनसोडे किती निधी देतात, याकडे शहराचे लक्ष लागले होते. त्यांनी कोरोना रुग्णांची नेमकी गरज ओळखून अचूक मदत केली आहे. आमदार निधीतून एक कोटी रुपये खर्च कोरोनावर करता येतो. मात्र, सिटी स्कॅन मशीन एक कोटी तीस लाख रुपयांचे असल्याने वाढीव खर्चासाठी सरकारची मंजुरी घेणार असल्याचे अण्णांनी ‘सरकारनामा'ला सांगितले.

कोरोनाग्रस्तांची फुप्फुसे किती संक्रमित आहेत,हे  CT स्कॅन मशीनद्वारे कळते. रुग्णाचा HRCT स्कोर किती आहे, त्यानुसार डॉक्टरांकडून रुग्णावर औषधोपचार केले जातात. कोरोना विषाणू फुफ्फुसावर आक्रमण करतो. त्यातून निमोनिया वाढल्याने रुग्णास श्वास घेण्यास त्रास होतो.

परिणामी रुग्णाच्या शरीरातील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊ होऊन तो अत्यवस्थ होतो. म्हणून रुग्णाचे फुफ्फुस किती संक्रमित आहे, याचा अचूक अंदाज CT स्कॅन मशीनच्या HRCT रिपोर्टद्वारे मिळतो. सध्या YCM हॉस्पिटलमध्ये खासगी कंपनीच्या मालकीचे हे मशीन आहे. तेथे बाराशे ते पाच हजार रुपये शुल्क आहे, आता ते द्यावे लागणार नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com