पाव टक्क्याने केला पिंपरी-चिंचवडचा घात; निर्बंध राहणार कायम

दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात बाधितांची संख्या वाढली, याकडे लक्ष वेधून त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता ग्रामीण यंत्रणा अधिक सक्षम होणे गरजेचे आहे.
पाव टक्क्याने केला पिंपरी-चिंचवडचा घात; निर्बंध राहणार कायम
Ajit Pawar .jpg

पिंपरी : फक्त .२ म्हणजे अवघा पाव टक्का कोरोना (corona) रुग्णवाढ अधिक असल्याने पिंपरी-चिंचवडला (Pimpri-Chinchwad) कोरोना निर्बंधातून आणखी मोकळीक आज मिळू शकली नाही. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांबरोबर रहिवाशांचाही काहीसा हिरमोड झाला आहे. तर, या रुग्णवाढीचे प्रमाण पाच टक्के असलेल्या पुणे शहराला, मात्र ही आणखी सवलत सोमवारपासून (ता.१४) देण्यात आली आहे. (Pimpri-Chinchwad  corona positivity rate is 5.2 percent)

पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक शुक्रवारी घेण्यात झाली, त्यात वरील निर्णय घेण्यात आला. पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते. दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात बाधितांची संख्या वाढली, याकडे लक्ष वेधून त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता ग्रामीण यंत्रणा अधिक सक्षम होणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा उभारणीवर भर देण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी पालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत यावेळी माहिती दिली. 

राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात पाच स्तर निश्चित केले आहेत. त्यासाठी काही निकष आहेत. त्यानुसार पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची घटती संख्या विचारात घेऊन तेथील निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून सोमवारपासून तो लागू करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज सांगितले. मात्र, कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हीटी दर पाच टक्क्यांच्या आत राहिला, तरच हा निर्णय लागू होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच पिंपरी-चिंचवड शहरासह पुणे जिह्यातही यापुर्वीचेच निर्बंध कायम राहतील असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवडमधील निर्बंध आठवडाभर कायम राहणार असल्याचे पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुण्याप्रमाणे त्यात आणखी सवलत मिळण्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांना आठवडाभर वाट पाहावी लागणार आहे. पिंपरी-चिंचवडचा पॉझिटीव्हीटी रेट हा ५. २ टक्के, तर पुण्याचा ५ टक्के असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे शहरातील दुकाने, हॉटेले ही चार वाजेपर्यंतच नियम पाळून उघडी राहणार आहेत. मॉल बंदच असतील. तर, दुसरीकडे पुण्यातील मॉल, सोमवारपासून उघडले जाणार असून तेथील दुकाने सायंकाळी सात, तर हॉटेल्स ही रात्री दहा वाजेपर्यंत उघडी राहणार आहेत. अभ्यासिका आणि वाचनालयेही खुली होणार आहेत. 

Edited By - Amol Jaybhaye 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in