पिंपरीतील व्यापाऱ्यांचाही लॉकडाऊनला विरोध; रॅली काढून प्रशासनाचा निषेध - Pimpari chinchwad merchants oppose lockdown declared by pcmc | Politics Marathi News - Sarkarnama

पिंपरीतील व्यापाऱ्यांचाही लॉकडाऊनला विरोध; रॅली काढून प्रशासनाचा निषेध

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 7 एप्रिल 2021

महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आजपासून ३० एप्रिलपर्यंत शहरातील सर्व दुकाने बंद केली आहेत.

पिंपरी : पिंपरी शहरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. त्याविरोधात बाजारपेठेत आज रॅली काढून निदर्शने करण्यात आली. दुकाने उघडण्याची परवानगी द्या, आम्ही सर्व नियम पाळतो, अशी विनंती त्यांनी महापालिका प्रशासनाला केली. दरम्यान, भाजप व पक्षाचे शहर कारभारी आमदार महेश लांडगे यांनी व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत लॉकडाऊनला विरोध केला आहे.

कोरोनाचा स्फोट झाल्याने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आजपासून ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व दुकाने बंद केली आहेत. त्याला पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनने तीव्र विरोध करीत पिंपरी कँम्पात अध्यक्ष  श्रीचंद आसवाणी यांच्या नेतृत्वाखाली व्यापा-यांनी बाजारपेठेतच रॅली काढून आज निदर्शने केली. लॉकडाऊन विरोधात फलक त्यांच्या हातात होते. यावेळी त्यांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला असणारा विरोध योग्य असल्याचे सांगत शहर भाजपचे अध्यक्ष महेश लांडगे यांच्या वतीने पाठिब्यांचे पत्र यावेळी व्यापारी फेडरेशनला देण्यात आले. कोरोना नियमामुळे आंदोलनाच्या ठिकाणी गर्दी होईल, म्हणून त्यात मला सहभागी होता येणार नसल्याचे पत्रात त्यांनी नमूद केले आहे. आंदोलनानंतर फेडरेशनने प्रशासनाला निवेदन दिले.

दरम्यान, कोरोनाची पिंपरी-चिंचवड शहरातील परिस्थिती गंभीर आहे. प्रत्येकाने जबाबदारीने वागा. अन्यथा काही दिवसात बेड मिळणे मुश्‍किल होईल, असा इशारा पिंपरी-चिंचवडचे महापालिका आय़ुक्त राजेश पाटील यांनी नुकताच दिला आहे. शहरात सध्या रुग्णालयापेक्षा घरी उपचार घेणाऱ्यांची संख्या पाचपट आहे.

त्यांच्यामार्फत आणि दुकानदार, चालक, वाहक, शिक्षक, सुरक्षारक्षक अशा सुपरस्प्रेडरमार्फत कोरोना अधिक पसरण्याचा धोका अधिक असल्याने त्यांनी जास्त काळजी घेण्याचे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले. विशेषत: तरुणाई कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. होम आयसोलेनमधील काहीजण बिनधास्त बाहेर फिरत असल्यानेही कोरोना वाढत असल्याचे पालिकेचे निरीक्षण आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख