पिंपरी महापालिकेला लस टंचाईचा फटका...४४ केंद्र बंद 

पिंपरी-चिंचवड शहराला दररोज दहा ते बारा हजार लशींची आवश्यकता आहे.
 पिंपरी महापालिकेला लस टंचाईचा फटका...४४ केंद्र बंद 
Sarkarnama Banner - 2021-04-28T103532.323.jpg

पिंपरी : पुरेशा लशीअभावी पिंपरी-चिंचवडमधील बहूतांश म्हणजे ४४ कोरोना लसीकरण केंद्रे आज (ता.२८) बंद ठेवण्याची वेळ महापालिकेवर आली. त्यामुळे येत्या महिन्याभरात शहरातील लसीकरण दहा लाखावर नेण्याच्या महापौर माई ढोरेंच्या घोषणेला तूर्तास करकचून ब्रेक लागला आहे.

दिवसागणिक शहराला लशींची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांची संख्याही त्यानुसार कमी होत आहे. काल ती वीस होती. आज ११ वर आली. वेळेत लसपुरवठा झाला नाही, तर उद्या त्यात आणखी घट होण्याची भीती आहे. सध्या फक्त पालिकेच्या रुग्णालयातच लसीकरण सुरु असून नागरिकांच्या सोईसाठी प्रभागातील लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. रविवारपासून शहराला राज्याकडून लसीचा पुरवठाच न झाल्याने ही आफत ओढवली आहे. शहराला दररोज दहा ते बारा हजार लशींची आवश्यकता आहे. मात्र, सध्या तेवढी ती मिळत नसल्याने शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या कमी केल्याचे पालिकेच्या लसीकरण मोहिमेचे प्रमुख व ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी आज सरकारनामाला सांगितले.

पालिकेच्या केंद्रांवर कालपर्यंत तीन लाख आठ हजार ९८७,तर खासगीमध्ये ७० हजार २९३ असे एकूण शहरात तीन लाख ७९ हजार जणांचे लसीकरण झालेले आहे. म्हणजे आतापर्यंत साडेतीन महिन्यात २५ लाखांपैकी फक्त बारा टक्के लसीकरण शहरात झाले आहे. मग, एका महिन्यात ते दहा लाख म्हणजे चाळीस टक्के कसे करणार हा प्रश्नच आहे. त्यामुळे ही फक्त घोषणाच राहणार असून आता लसीचा तुटवडाही निर्माण झाल्याने हे शिवधनुष्य पेलणे सध्या,तरी अवघड होऊन बसलेले आहे.

दुसरीकडे दोन दिवसानंतर महाराष्ट्र दिनापासून शहराच्या लोकसंख्येत मोठा वाटा असलेल्या तरुणाईच्या लसीकरणास (१८ वर्षावरील) सुरवात होणार आहे. सध्या शहरातील पालिकेची ५५, तर खासगी १० लसीकरण केंद्रे आहेत. सकाळी ४५ वर्षावरील काही गरजू व्यक्ती आपल्या प्रभागातील लसीकरण केंद्रावर पोचले, तेव्हा त्यांना केंद्रच बंद असल्याचे समजले. ती बंद राहणार असल्याचे पालिकेने आज सकाळी साडेआठ वाजता जाहीर केले. ४५ वर्षावरील आताच्या लसीकरणास असा ब्रेक लागल्याने मोठा ताण असणारी १ मे पासूनची १८ वर्षापुढील लसीकरणाची दुसरी मोहीम सुरळीत व सुरक्षित कशी पार पडणार याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. त्याचा अंदाज आल्यानेच शहरातील राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी कालच (ता. २७) पालिका आयुक्तांना या दुसऱ्या मोहिमेचे योग्य नियोजन करण्याची सूचना करून प्रशासनाला अगोदरच सावध केले होते. 

प्रशासन तथा लसीकरण यंत्रणेवर मोठा ताण येणार असल्याने या मोहिमेचे व त्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचे योग्य ते नियोजन करण्याची रास्त मागणी त्यांनी आयुक्तांकडे पत्राव्दारे केली होती. त्यांची भीती लगेचच खरी ठरली आहे. त्यामुळे खासगी खासगी रुग्णालयांची मदत या लसीकरण मोहिमेसाठी घेण्याच्या त्यांच्या सुचनेचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता प्रशासनावर आली आहे. त्यामुळे गर्दी न होता ही मोहीम वेळेत यशस्वी होण्यास मदत होणार आहे. तसेच महिन्यात दहा लाख नागरिकांचे लसीकरण करण्याच्या महापौरांच्या निश्चयालाही बळ मिळणार आहे.
Edited by : Mangesh Mahale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in