पवना जलवाहिनी : आमदार शेळके हे शेतकऱ्यांबरोबर की अजितदादांसोबत? 

तिकिटाच्या खेळासाठी कुणामध्ये बदल झाला, याची मावळ तालुक्‍यातील जनतेला पूर्ण कल्पना आहे.
पवना जलवाहिनी : आमदार शेळके हे शेतकऱ्यांबरोबर की अजितदादांसोबत? 
Pawana pipeline : Is MLA Shelke with farmers or with Ajit Pawar?

वडगाव मावळ : "तिकिटाच्या खेळासाठी कुणामध्ये बदल झाला, याची मावळ तालुक्‍यातील जनतेला पूर्ण कल्पना आहे. आमदार शेतकऱ्यांसोबत की पवना जलवाहिनीचे प्रवर्तक असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आहेत, हे प्रथम त्यांनी स्पष्ट करावे,' असा पलटवार भारतीय जनता पक्षाने आमदार सुनील शेळके यांच्यावर केला. 

"मावळातील भाजपच्या पुढाऱ्यांनी पवना जलवाहिनीबाबत त्याच तिकिटावर तोच खेळ करणे आता थांबवावे' अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शेळके यांनी केली होती. भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी या टीकेला प्रसिद्धी पत्रकाद्वारे उत्तर दिले आहे. 

"पवना जलवाहिनीविरोधात 2011 मध्ये झालेल्या आंदोलनाच्या वेळी विद्यमान आमदार जलवाहिनी विरोधी कार्यकर्ते होते. त्यावेळी राज्यात कॉंग्रेस आघाडीचे सरकार होते, तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते. आज राज्यात महाविकास आघाडीचे सरकार व पवार हेच उपमुख्यमंत्री आहेत.

आमदारांना खरोखर मावळच्या जनतेचा कळवळा असेल तर त्यांनी हा प्रकल्प रद्द करून दाखविल्यास त्यांचा जाहीर सत्कार करू. सवंग लोकप्रियतेसाठी शेतकऱ्यांच्या भावनांशी न खेळता प्रकल्पाच्या बाजूने आहात की विरोधात, हे जनतेसमोर जाहीर करावे,' असे आव्हान भाजपने पत्राद्वारे आमदार शेळके यांना दिले आहे. 

भाजपसह भारतीय किसान संघ, शिवसेना, कॉंग्रेस, रिपब्लिकन पक्ष व स्थानिक जनतेचा या प्रकल्पाला विरोध कायम आहे. त्यात अजिबात बदल होणार नाही. आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांचे बलिदान मावळ तालुक्‍यातील जनता वाया जाऊ देणार नाहीत. त्यामुळे आमदार सुनील शेळके यांनी प्रथम त्यांची भूमिका स्पष्ट करावी.

आमदार शेळके हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दबावामध्ये भाष्य करीत आहेत की ते जनतेबरोबर प्रकल्पाला विरोध करणार आहेत, असा सवालही भाजपने आमदारांना विचारला आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in